किव्ह – अमेरिका आणि अनेक युरोपीय राष्ट्रांनी निवडक रशियन बॅंकांची जगभारातील हजारो वित्तीय संस्थांना जोडणाऱ्या “स्विफ्ट’मधून हकालपट्टी केली. रशियाला अपेक्षेपेक्षा कडव्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. आपल्या सैन्याला रसद पुरवताना त्यांना अनपेक्षित अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे, असे अमेरिकेतील एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान जर्मनीने आपल्या लष्करी तरतुदीत भरीव वाढ करत रशियाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे.
जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्चोल्झ यांनी युक्रेनमधील युध्दाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. त्यावेळी ते म्हणाले, रशियन नेतृत्वाला युक्रेनवरील आक्रमणाने मोठी किंमत चुकवावी लागली, हे लवकरच समजेल असे सांगून स्चोल्झ म्हणाले, संसदेच्या अधिवेशनात जर्मन लष्करासाठी निधी उभारण्यात येईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे रात्रीत आपला मार्ग बदलणार नाहीत. आम्ही काल युक्रेनला शस्त्रे पुरवण्याचा निर्णय काल घेतला. पुतीन यांच्या आक्रमणाला यापेक्षा वेगळे उत्तर देणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान जर्मनीने आपल्या हवाई हद्दीतून विमाने नेण्यास रशियाला बंदी घातली आहे. मानवी मदत करणाऱ्या विमानांना तीन महिने वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. अनेक युरोपीय देशही रशियावर अशा स्वरूपाची कारवाई करण्यास पुढे येत असल्याचे वृत्त आहे.
बेलारसमधून किव्हच्या दिशेने डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र पाडल्याच दावा युक्रेनने केला. युक्रेन आणि त्याच्या नागरिकांवर केलेला हा दुसरा युध्द गुन्हा असल्याचे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे ओलेग निकिलेन्को यांनी सांगितेले. या युध्दात बेलारस महत्वाची भूमिका बजावत असून त्या सरकारच्या मदतीने त्या भूमीवरून युक्रेनवर हल्ले केले जात आहेत, असे ते म्हणाले.
रशियाने केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनमधील किमान 64 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण युध्दबळींची संख्या 240 असल्याचे संयुक्त राष्ट्रेने म्हटले आहे. नागरी वस्तीवर हल्ला केल्याने लाखो नागरिकांचा वीज आणि पाणी पुरवठा बंद झाला असल्याचे सुंयुक्त राष्ट्रेच्या मनवता वादी कार्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.
युक्रेन आंतरराष्ट्रीय न्यायालयात
रशिया लहान मुलांसह नागरिकांना लक्ष्य करत असून या संघर्षाचा आंतरराष्ट्रीय तपास करण्याची मागणी युक्रेनचे राष्ट्राध्क्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केली. ते म्हणाले, खार्किव्ह, ऍकर्तिका, किव्ह ओडेसा आणि अन्य शहरात रशिया काय करत आहे? आंतरराष्ट्रीय लवाद मागण्याचा या शहरांचा हक्क आहे. आम्ही त्यांच्या युध्द गुन्ह्यांचे डॉक्युमेंटेशन करत आहोत आणि असे असंख्य गुन्हे करूनही आमच्या धैर्यवान संरक्षकांवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. जगभरातील नागरिकांनी युक्रेनला मदत करावी.