कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी पंतप्रदानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीने कराचीपासून इस्लामाबादेपर्यंत “पीपल्स लॉंग मार्च’चे आयोजन केले आहे. या लॉंग मार्चला “पीपीपी’चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून कराचीमधून सुरू झाली. हा लॉंग मार्च पाकिस्तानमधील 34 प्रमुख शहरांमधून 8 मार्च रोजी राजधानी इस्लामाबादेत पोचणार आहे. त्यानंतर “पीपीपी’चे कार्यकर्ते संसदेला घेराव घालणार आहेत.
इम्रान खान यांच्या अकार्यक्षमतेविरोधात अविश्वास ठराव आणण्याची वेळ आता झाली आहे, असे बिलावल भुट्टो झरदारी यांनी जनसुदायाला संबोधित करताना सांगितले. कराचीतील लोक या “पपेट’ सरकारला कंटाळले आहेत. या सरकारने सत्तेतील 3 वर्षे पूर्ण केली आहेत. आता सरकार बदण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
मोटरसायकली, कार आणि अन्य वाहनांमधून “पीपीपी’चे शेकडो कार्यकर्ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. पाकिस्तानचे संस्थापक मोहंम्मद अली जिना संग्रहालयापासून या लॉंग मार्चला प्रारंभ झाला.
बिलावल यांच्या आई बेनजीर अली भुट्टो या 2007 मध्ये विजनवासातून परतताना ज्या ट्रकवर आरुढ झाल्या होत्या, त्याच ट्रकवर बिलावल भुट्टो स्वार झाले होते.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफने शनिवारी “हकूक ए सिंध’ नावाने सिंध प्रांतातील गोटकी पासून कराचीपर्यंत एका मार्चचे आयोजन केले आहे. सिंध प्रांतात “पीपीपी’चे सरकार आहे. त्या सरकारविरोधात हा मार्च काढण्यात आला आहे.