न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेनचे युद्ध काही केल्या संपत नाही. दोन्ही देश माघार घेण्यासाठी तयारी दर्शवत नाहीत. आंदरम्यान, याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने युक्रेनच्या युद्ध अपराधांसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्ध आणि इतर अपराधांसाठी व्लादिमिर पुतिन यांना जबाबदार धरले आहे. दरम्यान, रशियाने या संदर्भातील आरोपांचे खंडन केले असून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात जारी केलेला अटक वॉरंट अवैध आणि अमान्य असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या, “रशिया आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा सदस्य नाही. त्यामुळे कायदेशीररित्या न्यायालयाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. आम्ही न्यायालयाला कोणतेही सहकार्य करणार नाही. हा निर्णय अवैध असून आम्हाला अमान्य आहे.
दरम्यान, शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि राष्ट्रपती कार्यालयातील आयुक्त मारिया लावोवा-बेलोवा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्धाला व्लादिमिर पुतीन जबाबदार असल्याचं म्हणत पुतिन यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला.