गेल्या काही वर्षांपूर्वी अमेरिकेने दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानाने भारतात प्रवेश केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या अमेरिकेने आता मात्र पाकिस्तानला तीन लाख 58 हजार कोटी रुपयांची एफ-16 लढाऊ विमाने देण्याचा करार केला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील निर्णय विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी फिरविला आहे. भारताने नाराजी व्यक्त केली असली, तरी हा करार रद्द होण्याची शक्यता नाही.
भारत अमेरिकेचा कितीही जवळचा मित्र असला, तरी जेव्हा अर्थकारणाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा अमेरिका मित्रदेशाच्या हितसंबंधांनाही पायदळी तुडविते. यात नवीन काहीच नाही; परंतु दक्षिण आशियात आणि एकूणच जगात चीनचे वाढते महत्त्व पाहता चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने जी व्यूहनीती आखली होती, तिच्याशी विसंगत असा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या काळात अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध होते, असा दावा केला होता. त्यांच्या दाव्याला पुष्टी देणारा निर्णय अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बायडेन यांनी घेतला आहे. अमेरिका आणि चीनचे सध्या विळ्या-भोपळ्याचे नाते असताना चीनने पाकिस्तानला मदत करण्याची घोषणा केल्यानंतरच्या दोनच दिवसांत अमेरिकेनेही पाकिस्तानला लष्करी मदत करावी, हा अमेरिकेच्या धोरणातला विसंगतपणाच आहे.
अर्थात अमेरिकेकडून शस्त्रं खरेदी करणाऱ्या देशांची संख्या घटल्याने तेथील शस्त्रास्त्र उत्पादक सरकारच्या धोरणावर नाराज होते. भारतानेही अमेरिकेच्या इशाऱ्याची पर्वा न करता रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्रं आणि कच्चे तेल खरेदी केल्यामुळे अमेरिका नाराज होती. त्यातून भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एवढी मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील लोक अन्नासाठी दाही दिशा भटकत असताना दुसरीकडे लाखो रुपयांच्या विमान खरेदीचे करार होत असतील, तर भूक भावनिक मुद्द्यांवर मात करते, याचा अनुभव तेथील राज्यकर्त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. चिनी बॅंकांकडून पाकिस्तानला 18 लाख 28 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची बातमी दोन महिन्यांपूर्वीच आली होती. आता एफ-16 हे लढाऊ विमान अपग्रेड करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलाला तीन लाख 58 हजार कोटी रुपये दिले.
अर्थव्यवस्थेबाबत भीषण संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आता चीन आणि अमेरिका हे दोन्ही परस्परविरोधी देश मदत करीत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. पाकिस्तान हा आशियातील चीनचा सर्वात मोठा कर्जदार आहे. पाकिस्तानच्या 2021-22 च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात, वाईट टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानवर एकूण सहा लाख 97 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत चीनच्या जवळ जात असलेल्या पाकिस्तानला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अमेरिका मदत करीत आहे.
राजीनामा देण्यापूर्वी इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप केला होता की स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेने त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचला. अशा स्थितीत ट्रम्प यांना शह देण्यासाठी बायडेन यांनी निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, अमेरिकेशी शत्रुत्व अजिबात ठेवू शकत नाही. अमेरिकेने पाकिस्तानला वाईट काळात साथ दिली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचा पाकिस्तानबाबतचा बदललेला दृष्टिकोन सर्वांनाच चकित करणारा आहे. यामागं शरीफ कुटुंबाची अमेरिकेशी असलेली जवळीक हे कारण असावे.
हा करार पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा आहे हे समजून घेतले पाहिजे. पाकिस्तानची एफ-16 विमाने 39 वर्षे जुनी झाली आहेत. जुन्या फायटर जेटच्या अपग्रेडेशनसाठी पाकिस्तानला मदत हवी होती. एफ-16 लढाऊ विमाने 1983 पासून पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट आहेत. आता 39 वर्षांनंतर या लढाऊ विमानांच्या देखभालीची गरज भासू लागल्याने कमकुवत अर्थव्यवस्था आणि परकीय कर्जाखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ते कठीण होत चालले होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानने एफ-16 च्या लष्करी सुधारणा आणि देखभालीसाठी अमेरिकेकडे मदत मागितली होती. त्यानंतरच अमेरिकेच्या बायडेन सरकारने पाकिस्तानला 3 लाख 58 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असले तरी, अमेरिकेने लढाऊ विमानाच्या अपग्रेडशिवाय कोणतीही शस्त्रं आणि युद्धसामग्री देण्यास नकार दिला आहे. अपग्रेडेशनमुळे एफ-16 ची रडार आणि जॅमिंग क्षमता वाढेल. “यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स’ म्हणजेच “पेंटागॉन’च्या दाव्यानुसार, एफ-16 च्या अपग्रेडचा अर्थ या विमानांचे नव्याने आधुनिकीकरण करणे आहे. 1980 मध्ये बनवलेल्या एफ-16 मध्ये एपीजी-68 रडार असायचे, पण आता “एपीजी-83 एईएसए’ सारखे आधुनिक रडार त्यात बसवली जाऊ शकतात. ती प्रदीर्घ अंतर कव्हर करतात. एफ-16 चे इंजिन पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आधुनिक केले जाईल. “अपग्रेडेशन’चा मुख्य उद्देश इलेक्ट्रॉनिक युद्धाची क्षमता वाढविणे हा आहे. यासाठी एफ-16 मध्ये क्षेपणास्त्रं, शस्त्रं आणि जॅमिंगची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे बसवण्यात येणार आहेत. एफ-16 लढाऊ विमानांचे “सॉफ्टवेअर अपग्रेड’ केले जाईल. 2018 मध्ये ट्रम्प सरकारने पाकिस्तानची 16 हजार कोटी रुपयांची सुरक्षा मदत थांबवण्याची घोषणा केली होती.
‘पाकिस्तान, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात अपयशी ठरले आहे’, असा युक्तिवाद अमेरिकी सरकारने केला होता. आता चार वर्षांनंतर बायडेन यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची दहशतवादविरोधी क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण सहकार्य सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकारने म्हटले आहे की, यामुळं दोन्ही देशांच्या क्षमतेत अस्वस्थता निर्माण होईल. भारत सरकारला आशा आहे की, अमेरिका भारताच्या सुरक्षेच्या हिताची काळजी घेईल.
एफ-16 कार्यरत ठेवण्यासाठी अमेरिकेने हा आवश्यक निर्णय घेतला आहे. एफ-16 या लढाऊ विमानाची सध्या खूप चर्चा होत आहे. पाकिस्तानला भविष्यात दहशतवादविरोधी धोक्यांचा सामना करता यावा, यासाठी ही मदत देण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. ट्रम्प यांनी पाकिस्तानला अशा स्वरुपाची मदत बंद केली होती. आता हा निर्णय बायडेन प्रशासनाने मागे घेतला आहे. अमेरिकेच्या या मदतीने पाकिस्तानची ताकद किती वाढेल आणि भारताच्या सुरक्षेला काही धोका आहे का, असे प्रश्न डोके वर काढत आहेत.
ताकदीच्या बाबतीत विचार भारत या क्षेत्रात पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. 1971 च्या युद्धात पाकिस्तानकडे अनेक लढाऊ विमाने होती; पण ती सर्व भारतासमोर अपयशी ठरली. भारताची ताकद आता अनेक पटींनी वाढली आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तानला एफ-16 मध्ये सुधारणा करूनही काहीही साध्य होणार नाही.1971 च्या लढाईत भारताने पाकिस्तानी हवाई दलाला खडे चारले होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत प्रत्येक बाबतीत पाकिस्तानाहून सरस ठरला होता. या युद्धात भारतीय वायुसेनेने दाखविलेल्या शौर्याची जगाने नोंद घेतली होती.
मिग-21 लढाऊ विमानांच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले होते. मिग-21 हल्ल्यात पाकिस्तानची 13 लढाऊ विमाने उद्वस्त झाली. त्याच वेळी, युद्धादरम्यान केवळ एक मिग 21 नष्ट झाले. मिग-21 एस ने पाकिस्तानी हवाई दलातील सात एफ-104 ए स्टार फायटर्स, दोन एफ-6 (मिग-19), एक मिराज आयआयआय ईपी, दोन एफ-86 सेबर्स आणि एक सी 130 बी हर्क्युलस या विमानांना जमीन दाखविली. एवढेच नाही तर पाकिस्तानचे रणगाडे आणि इतर लष्करी तळही उद्ध्वस्त करण्यात मोठं यश मिळवले. मिग 21 च्या प्राणघातक हल्ल्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली.
पाकिस्तानकडे असलेल्या लढाऊ विमानांचा योग्य वापर करू शकला नाही. भारतीय हवाई दलातील शूर वैमानिक आणि मिगच्या पराक्रमासमोर पाकिस्तानची लढाऊ विमाने निरर्थक ठरली. अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तान आता एफ-16 चे आरोग्य सुधारणार आहे. हे तेच लढाऊ विमान आहे, जे विंग कमांडर अभिनंदन यांनी उद्ध्वस्त केले होते. भारतीय हवाई दलाच्या मिग-21 बायसनने पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाडले; मात्र पाकिस्तानने याचा इन्कार केला.
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती कशी आहे, हे जगजाहीर आहे. आता तो त्याच्याकडे असलेल्या विमानांची योग्य प्रकारे देखभाल करू शकेल अशी इतकी सुद्धा आर्थिक क्षमता त्याच्याकडं नाही. पाकिस्तानलाही ही लढाऊ विमाने स्वत: सांभाळता येत नाहीत. आता त्याला अमेरिकेची मदत मिळाली आहे, तर कदाचित त्यामुळे एफ-16 मध्ये थोडा श्वास घेऊ शकेल; मात्र हा पैसा तो यासाठी किती वापरणार, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. एफ-16 हे पाकिस्तानचे सर्वात शक्तिशाली विमान मानले जात होते.
1983 मध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून पहिले एफ-16 विमान मिळाले. अमेरिकेकडून हे विमान खरेदी केल्यानंतर त्याची संख्या हळूहळू वाढत गेली. तेव्हापासून ही विमाने पाकिस्तानी लष्कराचा भाग राहिली आहेत. हे पहिल्यांदा अमेरिकेच्या हवाई दलासाठी बनवले गेले. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते 360 अंश दृष्टी ठेवू शकते. हे विमान लेझर गाईड बॉम्बचाही सहज वापर करू शकते. 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने एफ-16 विमाने भारतीय सीमेवर तैनात केली. राफेल आल्यानंतर भारतासमोर पाकिस्तान कुठेही उभा राहिला नाही. भारतीय वायुसेना ही जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली वायुसेना आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे, तर पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था गटांगळ्या खाताना दिसते आहे.
अमेरिका अत्याधुनिक शस्त्र विकणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे या शस्त्रांच्या वापराबाबत विविध करार असून अमेरिकेची यावर निगराणी असते. अमेरिकेची डिफेंस सिक्युरिटी अँड कॉर्पोरेशन एजन्सी म्हणजेच “डीएससीए’च्या मते, एफ 16 विमान दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानला दिले होते. एफ-16 वापरण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर विविध 12 प्रकारच्या अटी ठेवलेल्या आहेत; पण पाकिस्तानने या सर्व अटी आणि नियमांना केराची टोपली देत अमेरिकेने दिलेल्या विमानाचा वापर थेट भारताविरोधात केला. नेहमीप्रमाणे एफ-16 या विमानांचा वापर आम्ही केलाच नाही, असा दावा पाकिस्तानने केला होता; पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या या खोटेपणाचा बुरखा फाडत थेट पुरावाच सादर केला.
भारताच्या मिग 21 ने एफ-16 हे अत्याधुनिक विमान पाडले होते. त्याचे पार्ट भारतीय वायूसेनेने दाखवले. पाकिस्तान सरकारकडे आधीच अस्तित्वात असलेल्या एफ-16 विमानांची दुरुस्ती केली जाईल आणि उपकरणेदेखील दिली जातील. तथापि, विमानात नवीन कार्यक्षमतेची कोणतीही योजना नाही आणि कोणतीही नवीन शस्त्रं दिली जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. यामुळे पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेत मदत होईल; मात्र यामुळे या भागातील लष्करी संतुलनावर परिणाम होणार नाही, असा अमेरिकी दावा आहे. त्याची सत्यता पडताळणीसाठी काही काळ वाट पाहावी लागेल.
– आरिफ शेख