स्वित्झर्लंडचा अफलातून टेनिसपटू रॉजर फेडररने आंतरराष्ट्रीय व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. खरेतर गेल्या काही काळापासून सातत्याने दुखापतींचा सामना करत असलेल्या फेडररकडून या घोषणेची अपेक्षा केली जात होती. मात्र, तरीही त्याची निवृत्ती चटका लावणारी ठरली यात शंका नाही.
जागतिक टेनिस विश्वात एक अत्यंत सालस, सज्जन खेळाडू अशी प्रतिमा असलेल्या फेडररने पदार्पणापासूनच आपला खास चाहतावर्ग तयार केला. त्याच्या खेळात बोरिस बेकरची जिद्द होती, तर इव्हान लेंडलसारखी वेगवान सर्व्हिस. कधीकाळी या बेकर, लेंडल, बियॉन बोर्ग, पीट सॅम्प्रास या खेळाडूंनी जागतिक टेनिसवर राज्य केले होते.
या सगळ्यांची संस्थाने फेडररने खालसा केली व जागतिक टेनिसचा अनभिषिक्त सम्राट बनला. त्याच्या खेळात एक ग्रेस होती जसे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्क वॉ याला एलिगंट असे संबोधले जायचे तसेच फेडररलाही संबोधले जात होते. त्याचा कोर्टवरचा वावर, तसेच कोर्टवरची त्याची संयमी शैली व स्वभाव हेच त्याचे गुणविशेष होते. तो जॉन मेकॉन्रोसारखा आदळआपट करणारा नव्हता तर राहुल द्रविडसारखा शांतपणे समोरच्याकडून चुका कशा होतील याची वाट पाहून मग वर्चस्व राखणारा खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती.
आधुनिक टेनिसचा बादशहा किंवा फेडेक्स या नावाने त्याला ओळखले जात होते ते त्याच्या एकूणच वावरावरून. तब्बल 20 ग्रॅंडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा हा टेनिस जगताचा लाडका खेळाडू गेल्या काही काळापासून सातत्याने दुखापतींचा सामना करत होता. याच दुखापतींमुळे त्याला गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने विविध स्पर्धांमधून माघारही घ्यावी लागत होती. अखेर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. अत्यंत सुवर्ण कारकिर्दीची अशी निवृत्ती अवघ्या टेनिसविश्वाला धक्का दोणारी ठरली आहे.
लेवर करंडक अखेरची स्पर्धा ठरणार
इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात होत असलेली लेव्हर कप टेनिस स्पर्धा ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार आहे. कोर्टवरच निवृत्त होण्याचे त्याचे स्वप्न या स्पर्धेद्वारे पूर्ण होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तो दुखापतींमुळे कंटाळला होता. खरेतर त्याला आपल्या ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांच्या संख्येत आणखीही मोठी भर घालण्याची संधीही मिळाली होती. मात्र, यंदाच्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमधूनही त्याला एक्झिट घ्यावी लागली. तेव्हापासूनच तो येत्या काळात निवृत्ती जाहीर करेल याची अपेक्षाही केली जात होती. विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत यंदा त्याने सहभाग घेतला नसला तरीही त्याला खास आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्याचे स्पर्धक स्पेनचा राफेल नदाल तसेच अन्य मानांकित खेळाडू त्याचा सत्कार होत असताना उपस्थितही होते व त्यावेळी त्यांना फेडररची जागतिक लोकप्रियता व कीर्ती पाहून हेवा वाटला असेल. जसे भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आबालवृद्धांचा लाडका आहे, तेच स्थान टेनिसमध्ये फेडररचे होते यात शंका नाही. याच फेडररचा खेळ पाहण्यासाठी खुद्द सचिनही विम्बल्डन सेंटर कोर्टवर उपस्थित असायचा व तेथेच या दोघांची भेटही होत असे.
क्रिकेट म्हणजे काय?
सचिनची भेट झाली तेव्हा फेडररला हेच समजेनासे झाले होते की क्रिकेट म्हणजे काय व सचिन इंग्लंडमध्ये इतका लोकप्रिय कसा? मात्र, त्याने जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्याला आकलन झाले की, तो जसे जागतिक टेनिसवर अधिराज्य गाजवत आहे तेच राज्य सचिन क्रिकेटमध्ये गाजवत आहे. त्यांच्यातील मैत्रीचे तसे अनेक किस्से सांगता येतील मात्र, या दोघांची झालेली मैत्री एकूणच क्रीडा क्षेत्रात चर्चिली जात होती. विम्बल्डन टेनिस स्पर्धा सुरू असताना सचिन जसा प्रेक्षक म्हणून उपस्थित असायचा तसाच एकदा फेडररही लॉर्डस या क्रिकेटच्या राजधानीत एका कसोटी सामन्याला हजर राहिला होता व त्यावेळी त्याला क्रिकेटचे वेड काय असते हे देखील लक्षात आले. त्यानंतर मात्र, त्याने क्रिकेट म्हणजे काय, असे कधीही विचारले नाही.
प्रतिस्पर्ध्यांसाठी प्रेरणा
फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याचे स्पर्धक स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोवाक जोकोवीच यांनाही धक्का बसला. आज कोणत्याही नवोदित टेनिसपटूला विचारले की, तुला काय व्हायचे आहे तर तो एका क्षणात फेडररसारखा खेळाडू बनायचे असल्याचे सांगतो. नदाल व जोकोवीच यांनी फेडररचाच खेळ पाहून आपलीही गुणवत्ता वाढवली. तसेच ज्याला प्रेरणा मानले त्याच्याच विरुद्ध सातत्याने सामना खेळायला मिळाला व त्यांचे स्वप्नही पूर्ण झाले. त्याचा खेळ पाहूनच आपल्याला प्रेरणा मिळाली व प्रत्यक्ष त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधीही मिळाली यासाठी आम्ही कायमच स्वतःला नशीबवान समजू, असे नदाल व जोकोवीच यांनी मत व्यक्त केले यातच सर्वकाही आले.
शैलीदार आणि जगजेत्ता
फेडरर फोरहॅंड तसेच बॅकहॅंड फटक्यांमुळे तसेच रिटर्न करताना शैलीदार टेनिस खेळण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याचे बॅकहॅंड फटके तर इतके अफलातून होते की समोरच्या खेळाडूला त्याच्या वेगाचा अंदाजच येत नसे. वयोपरत्वे त्याचा तो वेग कमी झाला होता तरीही त्याची शैली कायमच अवडती राहिली. त्याने व्यावसायिक टेनिसमध्ये तब्बल 20 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवली. त्यात सहा ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन (2009), आठ विम्बल्डन (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) व पाच यूएस ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) विजेतेपदांचा समावेश आहे. 2018 साली त्याने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर मात्र, दुखापतींनी त्याला ग्रासले व हेच त्याचे कारकिर्दीतील अखेरचे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले.
20 ग्रॅंडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू
व्यावसायिक टेनिसमध्ये तब्बल 20 ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे प्राप्त करणारा फेडरर पहिलाच पुरुष खेळाडू ठरला. तसेच त्याच्याकडूनच प्रेरणा घेत नदाल व जोकोवीचने ही संख्या पार केली. प्रत्येक विक्रम मोडण्यासाठीच असतो हेच यातून सिद्ध होते. मात्र, जी कामगिरी एखादा खेळाडू पहिल्यांदा करतो तेव्हा त्याचे विशेष कौतुक राहते तेच फेडररचे राहणार यात शंका नाही. त्याच्या नावावर आणखी एक अनोखी कामगिरी नोंदली गेली आहे. तो तब्बल 310 आठवडे एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. त्यातही जवळपास 237 आठवडे क्रमवारीत सलग पहिल्या स्थानावरही राहिला होता. अशी कामगिरी केलेला तो पहिलाच टेनिसपटू ठरला होता. तसेच सलग पाच वर्षे यूएस ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकत त्याने विक्रमही आपल्या नावावर केला. 2004 ते 2008 या कालावधीत ही कामगिरी त्याने केली होती.
24 वर्षे व दीड हजार सामने
ग्रासकोर्टचा बादशहा असलेल्या फेडररने तब्बल 24 वर्षांची कारकीर्द अत्यंत मेहनतीने व जिद्दीने उभी केली. या कालावधित तो ग्रॅंडस्लॅम तसेच अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळून दीड हजार सामने खेळला. ही त्याची मॅरेथॉन कारकीर्दच अनेकांना स्वप्नवत वाटते. सचिन तेंडुलकर व फेडरर यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर या दोघांनीही 24 वर्षे आपापल्या क्रीडा प्रकारात राज्य केले. या संपूर्ण वाटचालीत एकदाही कोणत्याही वादांशी तसेच गैरवर्तनाशी त्याचे नाव जोडले गेले नाही. म्हणूनच टेनिसमधील सज्जन खेळाडू असाच त्याचा उल्लेख केला जातो.
सॅम्प्रास ते नदाल
आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये अमेरिकेचा पीट सॅम्प्रास जेव्हा वर्चस्व राखत होता, त्याच काळात फेडररचा उदय झाला. त्याने आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केले त्यात खुद्द सॅम्प्रासही होता. सॅम्प्रासने त्याच्या कारकिर्दीत 14 ग्रॅंडस्लॅम विजय मिळवले तेव्हा हा पल्ला कोणी पार करेल का असा प्रश्न केला जायचा. हेच शिखर पुढे काही काळातच फेडररने पार केले व नवा कीर्तिमान तयार केला. फेडररला अनेक स्पर्धामधून दुखापतींमुळे माघार घ्यावी लागली व त्यामुळे राफेल नदाल व नोवाक जोकोवीच यांना त्याची कामगिरी मागे टाकण्याची संधीही मिळाली. नदालच्या नावावर आतापर्यंत 22 तर जोकोवीचच्या नावावर 21 ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे आहेत. फेडररला अन्य छोट्या मोठ्या दुखापतींपेक्षा उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीने जास्त सतावले. त्याच्या या गुडघ्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र, तो पूर्ण तंदुरुस्त कधीही होऊ शकला नाही. या दुखापतींनी वारंवार डोके वर काढले व त्यामुळेच अखेर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.
क्रीडा क्षेत्रात असे अनेक खेळाडू असतात की जे निवृत्त झाल्यावरही चर्चेत राहतात त्यात फेडररही राहणार यात शंका नाही. हेच असे काही खेळाडू असतात की ज्यांचा खेळ व कारकीर्द पाहून नवोदित प्रेरणा घेतात व पुढील काळात आपले वर्चस्व सिद्ध करतात. व्यावसायिक टेनिसबाबत जेव्हा जेव्हा चर्चा होइल तेव्हा फेडरर हाच केंद्रस्थानी असेल हे कोणीही नाकारणार नाही. जागतिक टेनिसला नवी उंची तसेच अमाप लोकप्रियता मिळवून देणारा फेडरर निवृत्त झाला असला तरीही याच खेळाशी यापुढेही जोडलेला राहावा हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे