पोलीस स्टेशन येथे 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जातेगाव रोडलगत असलेल्या बोरमळा येथे असलेल्या जमिनीच्या वादातून पुन्हा वाद निर्माण होऊन दोन गटांत हाणामारी झाली. दोन्ही गटांच्या 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जातेगाव रोडलगत असलेल्या जमिनीच्या वादातून यापूर्वी कळमकर, करंजे व पलांडे यांचा वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात सुरू असताना देखील वाद संपलेला नाही. या वादातून कळमकर व करंजे या दोन गटांमध्ये पुन्हा वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी तक्रार दिली आहे. या तक्रारीत दिगंबर कळमकर यांनी आम्ही आमची जमीन नांगरत असताना त्या ठिकाणी सचिन पलांडे व आदींनी येऊन मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे, तर संगीता करंजे यांनी आमच्या शेत जमिनीत कळमकर हे नांगरणी करत असताना त्यांना समजावून सांगितले असताना त्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
याबाबत दिगंबर कळमकर (रा. बोरमळा शिक्रापूर ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी सचिन सयाजी पलांडे (रा. मुखई ता. शिरूर), अजित चंद्रकांत करंजे, श्रीकांत ऊर्फ बाळ्या चंद्रकांत करंजे, चंद्रकांत मनोहर करंजे (सर्व रा. बोरमळा शिक्रापूर ता. शिरूर), नवले ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) तसेच चार अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर संगीता करंजे रा. बोरमळा शिक्रापूर ता. शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी दिनकर नारायण कळमकर, संपत दिनकर कळमकर, दिगंबर दिनकर कळमकर, धनंजय दिनकर कळमकर, सिंधुबाई दिनकर कळमकर सर्व राहणार (रा. बोरमळा शिक्रापूर ता. शिरूर) यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करत आहेत.