वाघोली (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रावर दिव्यांगांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांगांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दिव्यांगांचे मतदान महत्वाचे आहे, असे मत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार संघात दिव्यांगांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी दिव्यांगत्वानुसार आवश्यक सोयी-सुविधांची दिव्यांग क्षेत्रात कार्यरत सर्व संस्था-संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळावी म्हणून प्रहार अपंग संघटनेच्या मागणीवरुन पुणे जिल्हा परिषदेच्या शिवनेरी सभागृहात आयोजित बैठकीत धर्मेंद्र सातव बोलत होते.
यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते योगेश पोळ, निमवैद्यकीय अधिकारी किरण बोडके, सुदेशना राव, पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागाचे अधिकारी रामदास चव्हाण, भावना मोहोड, प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे,
पुणे शहर पदाधिकारी सुनंदा बामणे, सुजाता पवार, सचिन ओव्हाळ, संगिता राऊत, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे, दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे प्रदीप कामठे, पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे रफिक खान, आकाश कुंभार, राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या नीता ढवाण, रेडक्रॉस मूकबधिर स्वयंरोजगार संस्थेचे सुजित गोयर यांचेसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
प्रवीण कोरगंटीवार म्हणाले, पुणे जिल्ह्यात 3117 ठिकाणी मतदान होणार असून 8382 केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी असलेल्या दिव्यांगांची संख्या 75039 आहे. यासाठी 3357 व्हीलचेअर उपलब्ध असतील तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी 5118 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजा लक्षात घेऊन सक्षम अॅपद्वारे मागणी केलेल्या सुविधा उपलब्ध करुन देणे, दिव्यांगांना मतदान केंद्र तळ मजल्यावर करणे, रॅम्प, पुरेशा व्हीलचेअर, दिव्यांगांची स्वतंत्र रांग, दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, पार्किंग,
गरजेनुसार स्वयंसेवक, प्रथमोपचार पेटी, मदतकक्ष, अंशत: अंध दिव्यांगांसाठी मॅग्नीफाईग ग्लास (भिंगाच्या काचा), ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी साइन लॅग्वेज दुभाषक, ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था तसेच ज्यांनी 12ड फॉर्म भरलाय त्यांना घरातून मतदान करण्यासाठी यंत्रणा अशा 28 प्रकारच्या सुविधा दिव्यांगांसाठी दिल्या जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिव्यांगांना घरातून मतदान करण्यासाठीच्या 12 ड या फॉर्म बाबत दिव्यांगांना पुरेशी माहिती नसल्याने मोजक्याच दिव्यागांना ही सुविधा मिळणार आहे. यापुढील निवडणुकीपूर्वी गरजू दिव्यांगांना याविषयी माहिती मिळाली तर दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का वाढेल. -सुरेखा ढवळे, महिलाध्यक्षा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना
दिव्यांगांनी भारतीय नागरिक म्हणून आपल्या अधिकाराप्रमाणेच मतदान हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडले पाहिजे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आगामी काळात सर्व योजनांच्या लाभासाठी मतदान केल्याची पावती बंधनकारक करावी. -हरिदास शिंदे, अध्यक्ष संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे