मैत्रिणीचा लिव्हर बदलण्यासाठी मदतीची हाक
भवानीनगर -कॉलेज मित्रांनी सहकारी मैत्रीणीला जडलेल्या गंभीर आजारातून वाचवण्यासाठी दारोदार फिरून आर्थिक मदत गोळा केली. त्या गंभीर संकटातून आपल्या मैत्रीणीला बाहेर काढण्यासाठी. खऱ्या मैत्रीचा आणि खऱ्या जीवनाचा इतरांसाठी हा मूलमंत्र ठरला आहे. कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांना आलेली हीच समज पुढील काळात समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारी आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी 2018-19 मध्ये काटेवाडी (ता. बारामती) येथील आरती किसन काटे ही मुलगी शिक्षण घेत होती. त्याच दरम्यान तिचे लग्न झाले. परंतु काही कालांतरानंतर त्या मुलीस आजार सुरू झाला आणि तो आजार एवढा भयंकर होता की तिचे लिव्हर खराब झाल्याने ते लिव्हर बदलणे गरजेचे होते. तो लिव्हर बदलण्यासाठी डॉक्टरांनी साधारणपणे पंचवीस लाख रुपये खर्च सांगितला होता.
लिव्हर बदलण्यासाठी ही एवढी मोठी रक्कम कशी जमा करणार हा प्रश्न उपस्थित असताना श्री छत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुलांना ही माहिती समजली. या विद्यालयातील मुलांनी आपल्या मैत्रिणीला झालेला आजार हा गंभीर स्वरूपाचा असून तिला मदत करण्यासाठी दहा मुलांचे ग्रुप केले. तिला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढला. तिला येणाऱ्या खर्चासाठी ही आर्थिक मदत निर्माण केलेली आहे.
खऱ्या अर्थाने कॉलेज जीवनापासूनच जीवनामध्ये आपणही कोणाचे काहीतरी देणे लागतो. माणसासाठी माणूस आणि माणुसकीच उपयोगी पडते हाच खरा जीवनाचा मतितार्थ या मुलांनी ओळखला असल्याने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन या मुलीला आर्थिक मदत मिळवली आहे.
नवीन पिढीमध्ये रुजतेय मदतीची भावना
खरी मदत एखादा आजार झाल्यानंतरच करण्याची गरज असते. ही खरी मदत आज उन्हात फिरूनही आपल्या मैत्रिणीला आर्थिक मदतीचा हात कसा देता येईल हा एकमेव ध्यास घेऊन ही मुले परीश्रम घेत आहेत. याबद्दल सर्व परिसरातून या मुलांचे कौतूक होत आहे. खऱ्या अर्थाने नवीन पिढीमध्ये मदत करण्याची भावना रुजली असून सामाजिकदृष्ट्या समाजहिताचे कामही करण्याची ताकद या मुलांमध्ये आली असल्याचे चित्र दिसत आहे.