सूचनांची अंमलबजावणी न केल्यास दुकान बंद करण्याचे निर्देश
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील रास्त भाव दुकानदारांसाठी नियमावली जाहीर केली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करणे सर्व दुकानदारांना बंधनकारक आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे व नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात. शहरात करोना निषाणूचा संसर्ग व प्रसार वेगाने वाढत आहे.
यासाठी प्रतिबंधात्मक व नागरिकांच्या सुविधांबाबत शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मे व जून 2020 महिन्यांकरता अंत्योदय अन्न योजना व अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी पोलिसांकडून ही नियमावली जाहीर केली आहे.
पोलिसांकडून जाहीर झालेली नियमावली
– सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी राहील.
– टोकन मिळविण्यासाठी सकाळी आठपूर्वी गर्दीची शक्यता लक्षात घेता ती टाळण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त असणार आहे.
– नागरिकांना उभे राहताना दुकानदारांना रांगेचे योग्य मार्किंग करावे लागणार आहे.
– आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय करणे दुकानदारांना बंधनकरारक आहे.
– संचारबंदीचे आदेश शहरात लागू आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य वाटप दुकानात जाण्याच्या निमित्ताने इतरांकडून आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या दुकानात जाणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृत टोकन असल्याची खात्री करण्यात येणार आहे.