सध्या संपूर्ण जगभरात करोना व्हायरसने कहर केलेला आहे. या साथीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारही ठप्प झाले आहेत. याचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, पण आता एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट करोना व्हायरसवरच आधारित आहे. या चित्रपटाचे नाव “कोरोना जोम्बीज’ असे आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. करोना विषाणूवर बनलेला हा जगातील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चार्ल्स बॅंड यांनी केले आहे.
करोनाचा कहर सुरू असताना तयार केलेल्या या चित्रपटात सामाजिक अंतर ठेवण्याची काळजी घेतली गेली आहे. या चित्रपटात रसेल कोकर, कोडी रेनी कॅमेरून आणि रॉबिन सिडनी यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट संपूर्णपणे काल्पनिक आहे. या चित्रपटात असे दर्शविले गेले आहे की जे लोक करोनाला बळी पडतात ते मृत्यूनंतर जोम्बी बनतात.
दिग्दर्शकाने चित्रपटात थरार आणि भयपट दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात बरीच वास्तविक गोष्टीही दाखविण्यात आल्या आहेत. या विशेष करून करोनाविषयी दिग्गज नेत्यांच्या पत्रकार परिषदेचे वास्तविक फुटेज देखील वापरण्यात आले आहे.