पुणे रेल्वे स्थानकाबाहेर नियमभंगाच्या “उड्या’

पुणे  – दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोना टेस्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. यासाठी पुणे रेल्वेस्थानक आणि विमानतळावर तपासणी यंत्रणा उभी आहे. परंतु, अनेक प्रवासी तपासणी प्रक्रियेतून पळवाट काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून बाहेर पडत आहेत. 

 

तर काही जणांना संबंधित अधिकारीच वाट करून देत असल्याचे पुणे स्थानकावरील आरक्षण खिडक्यांजवळील गेटच्या परिसरात दिसले. एकीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच, प्रवाशांना मिळत असणारी सूट आगामी काळात नागरिकांच्याच जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

 

पुण्यात आणि पुण्यामार्गे चार प्रतिबंधित राज्यांतून दररोज 8-10 गाड्या येतात. बहुतांश गाड्यांमध्ये 500 हून अधिक प्रवासी असतात. या प्रवाशांची तपासणी फूट ओव्हर ब्रीजवर महापालिकेकडून करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केवळ संबंधित प्रवाशांना फूट ओव्हर ब्रीजपर्यंत जाण्यासाठी सांगण्यात येते. मात्र अनेक प्रवासी या कचाट्यातून वाचण्यासाठी पलायन करतात. त्यामुळे तपासणी न झालेल्या प्रवाशांकडून करोनाचे संक्रमण होण्याचा अधिक धोका आहे.

 

पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेकडून तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, यासाठी रेल्वेने कर्मचारी तैनात केले आहेत. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून प्रवासी बाहेर पडत असावेत. या प्रकाराबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्यात येतील.

– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.