पुणे – महापालिकेकडून मिळकतधारकांना ३१ मार्चपूर्वी २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मिळकतकराची बिले पाठविली जाणार आहेत. हे बिल दरवर्षी साध्या पोस्टाने पाठवले जातात. मात्र, दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख मिळकतधारक पोस्टाने बिले मिळाली नसल्याची तक्रार करतात. त्यामुळे अशा नागरिकांना आता स्पीड पोस्टने बिले पाठविण्यात येणार आहेत.
महापालिका हद्दीतील मिळकतींसह, नव्याने समाविष्ट गावांमधील सुमारे १२ लाख ५० हजार नोंदणीधारक मिळकतींना कराचे बिल पाठविण्यात येणार आहेत. दरवर्षी पालिकेकडून पोस्टाने हे बिल पाठवले जाते. मोठ्या तसेच उंच सोसायटींमध्ये हे बिल देणे शक्य नसल्याने अनेकदा पोस्टमन सोसायटीचे कार्यालय अथवा वाॅचमनकडे बिल देतात अथवा लेटर बाॅक्समध्ये टाकतात. त्यामुळे अनेकदा संबधित नागरिकास बिल मिळत नाही.
परिणामी, या नागरिकांकडून बिल मिळाले नसल्याचे सांगत ते भरण्यास टाळाटाळ केली जाते. अथवा महापालिकेचे बिल मिळालेले नसल्याने दंड कमी करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे महापालिकेची थकबाकीही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन कर संकलन विभागाने आता अशा सुमारे अडीच लाख मिळकतींना स्पीड पोस्टाने बिल पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
काम अंतिम टप्प्यात
महापालिकेकडून पुढील आर्थिक वर्षांची बिल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे बिल तयार झाल्यानंतर लगेचच छपाईसाठी दिले जाणार आहेत. त्यानंतर जशी छपाई पूर्ण होईल, तशी ती पाठविण्यात येणार आहेत. हे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“स्पीड पोस्टने मिळकतकर बिल पाठवल्यास प्रत्यक्षात संबंधित तक्रारदाराला ते मिळाले किंवा नाही, तसेच ते परत आल्यास नेमके काय? हे समोर येण्यास मदत होणार आहे.” – डाॅ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मनपा