चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सीने सुमारे 12 कोटी 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर येथे वाइल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग करणाऱ्या एजन्सी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याच्या पगाराला उशीर झाला होता आणि तेव्हाच या आर्थिक गैरव्यवहाराची चाहूल लागली होती. या कारवाईने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या एजन्सीने करारनाम्यानुसार तीन वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा केला.
तर उर्वरित 12 कोटी 15 लाखांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालकांचे 1 जूनपासूनचे पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 338 जिप्सी असून जिप्सी चालकांची थकीत रक्कम अंदाजे 3 ते 4 कोटींच्या घरात आहे. या कारवाईने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशासनाकडून कबुली
Mytadoba.org ही ताडोबाची बुकिंग वेबसाइट गेल्या तीन वर्षांपासून एका खासगी व्यक्तीला हाताळण्यासाठी देण्यात आली होती आणि या व्यक्तीचा कॉन्ट्रॅक्ट 1 जून पासून समाप्त करण्यात आला आहे.
मात्र याच व्यक्तीने बुकिंग मार्फत जमा झालेले पैसे ताडोबा प्रशासनाला दिले नसल्याने हे पेमेंट लेट होत असल्याचा जिप्सी चालकांचा आरोप आहे.
दुसरीकडे ताडोबा प्रशासन पैसे जमा न झाल्याचे मान्य केले. मात्र हा उशीर 1 जुलैपासून ताडोबा बंद झाल्यावर वर्षभराचा हिशोब करायचा आहे, म्हणून होत असल्याचे ताडोबा प्रशासनाने सांगितले.