मुंबई – सोमवार रात्री ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. ठाण्यातील कासारवडवली या भागात सदर प्रकार घडला. शिंदे गटातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्य़ालय आहे, तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील तपास सुरू करू, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
या सर्व घटनेवर आता रोशनी शिंदे यांनी पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे. त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या,’माझ्यावर वैयक्तिक राग काढला गेला कारण मी एखाद्या राजकीय पोस्टला उत्तर दिलं. ठाण्यात मुख्यमंत्र्यांची दडपशाही सुरु आहे.’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’आम्ही सुरक्षित नाही, हेच यावरून दिसून आले आहे. आज मला पोटात प्रचंड मारहाण केली. मला खूप दुखत आहे. श्वास घ्यायला त्रास होतोय, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली, असे आरोप शिंदे यांनी केले आहेत.’
दरम्यान यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली आहे. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.