लिस्बन – स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर पोर्तुगालने विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. या दोन गोलमुळे आता आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम रोनाल्डोच्या नावावर नोंदला गेला आहे.
पोर्तुगालने हा सामना 2-1 असा जिंकला. रोनाल्डोच्या नावावर आता 111 गोल आहेत. रोनाल्डोने अली देईच्या 109 गोलला मागे टाकत ही कामगिरी केली. या दोघांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फुटबॉलपटूला 100 गोलचा टप्पा गाठता आलेला नाही.
या सामन्यात दोन्ही गोल रोनाल्डोनेच केले. सामन्याच्या 45 व्या मिनिटाला जॉन ईगनने गोल करत आयर्लंडला 1-0 अशी आघाडी घेऊन दिली. या सामन्यात पोर्तुगाल पिछाडीवर असताना रोनाल्डोने 89 व्या मिनिटाला पहिला आणि अतिरिक्त वेळेत सहाव्या मिनिटाला दुसरा गोल करत पोर्तुगाल संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला.
अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याने 151 सामन्यांत 76 गोल केले आहेत. तर भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री 74 गोलसह 12 व्या स्थानावर आहे.