दुबई – भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्यानंतर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील खेळाडूंच्या स्थानात बदल होताना दिसत आहेत. भरात असलेला इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आला आहे. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. मात्र, हिटमॅन रोहित शर्माला टॉप फाइव्ह फलंदाजांमध्ये स्थान मिळाले आहे.
पाच वर्षांत पहिल्यांदाच कोहली टॉप फाइव्हमधून बाहेर पडला आहे. कोहलीला इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या आतापर्यंतच्या 5 डावात केवळ एक अर्धशतकी खेळी करता आली आहे. त्याच्या सुमार कामगिरीमुळेच त्याचे क्रमवारीतील स्थान खालावले आहे. रोहित कसोटी मालिकेत सरस कामगिरी करत आहे. त्यामुळे तो टॉप फाइव्हमध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा 773 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन 901 गुणांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 891 गुणांसह तिसऱ्या, तर मार्नस लॅबुशेन 878 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
कसोटी गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच पॅट कमिन्स 908 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 839 गुणांसह रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या, 824 गुणांसह टीम साऊदी तिसऱ्या, 816 गुणांसह जोश हेजलवूड चौथ्या, तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 813 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या क्रमवारीत 758 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.