मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी अधिकाऱ्यांकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. बारामती अॅग्रोसंबंधित प्रकरणात ही चौकशी होती. चौकशीनंतर रोहित पवार बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती.
बारामती अॅग्रो कंपनी आमदार रोहित पवार यांच्या मालकीची आहे. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावून 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज त्यांची तब्बल 12 तास ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली.
रोहित पवारांवर आरोप काय?
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेने लिलाव केला. या लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. 50 कोटी रूपयांत बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतले व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.