Rohit Pawar in Belgaon – कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या आगळिकीमुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची मागील काही दिवसांतील वक्तव्य तपासल्यास ते आगीत तेल ओतण्याचेच काम करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारकडून मात्र सातत्याने नरमाईची भूमिका घेतले जात असल्याचे चित्र आहे. शिंदे -फडणवीस सरकारच्या नरमाईच्या भूमिकेचे एक उदाहरण म्हणजे, बोम्मई यांच्या इशाऱ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा नियोजित बेळगाव दौरा गुंडाळण्यात आला. सीमाभागातील आपला दौरा खुद्द मंत्री महोदयांनी गुंडाळला असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावला भेट दिली आहे. रोहित पवार यांच्या या बेळगाव दौऱ्याचे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत कौतुक केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी रोहित पवार यांनी, बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. हा फोटो पोस्ट करताना पवार यांनी, “मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले.” अशी माहिती दिली.
बेळगाव शहरातील दख्खनचा राजा जोतिबा मंदिराचे दर्शन घेतले. मराठी भाषिकांच्या लढ्याला यश येऊन बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा, यासाठी दख्खनचा राजा जोतिबाला यावेळी साकडे घातले. pic.twitter.com/GApTShgZNn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2022
रोहित पवार यांनी जोतिबा मंदिराच्या दर्शनाची ट्विट केलेली पोस्ट रिट्विट करत संजय राऊत यांनी, “जय महाराष्ट्र! मंत्री पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले! इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात.” असं म्हंटलंय. दरम्यान, सीमावादाचा प्रश्न चिघळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील हल्ले न थांबल्यास आपल्याला त्यांना धीर देण्यासाठी जावे लागेल असा गर्भित इशारा दिला होता.
जय महाराष्ट्र!
मंत्री पोहोचले नाहीत.पण रोहित पवार बेळगावात पोहोचले!इच्छा आणि हिम्मत असली की आडवे येणारे पळून जातात. https://t.co/FBRgfwAnYX— Sanjay Raut (@rautsanjay61) December 13, 2022