पुणे – हडपसरमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका तरुणाचा बोपदेव घाटात गोळी झाडून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. चेष्टा मस्करीत चुकून गोळी लागल्याचे आरोपींनी प्राथमिक तपासात सांगितले आहे. त्यांचा एक साथीदार अद्यापही फरार आहे.
गणेश नाना मुळे (21 , रा. सातववाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव. याप्रकरणी पोलिसांनी योगेश सुभाष भिलारे (24), रोहन राजेंद्र गायकवाड (23 ) व अक्षय संदीप गंगावणे (21) यांना अटक केली आहे. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण क्षिरसागर व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश मुळे व संशयित आरोपी मित्र आहेत. रविवारी हडपसरमधून गणेश बेपत्ता झाला होता. दरम्यान गणेश मित्रांबरोबर बाहेर गेला होता, मात्र त्याचे मित्र परतले असून तो अद्यापही परतला नसल्याने काही तरी गडबड असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांच्या पथकाने गणेशचा शोध घेण्यास सुरूवात केली.
चौकशीसाठी त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चुकून गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. मात्र घाबरल्याने त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकल्याची माहिती दिली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे लागलीच पोलिसांनी गणेशचा शोध घेतला. बोपदेव घाटात गणेशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार आहे.