Rohan Murthy । कुटुंबाचा उद्योग व्यवसाय असला की साधारणपणे सुस्थापित अशा व्यवसायात पुढची पिढी काम करू लागते. मात्र त्याला काही अपवाद देखील असतात. अनेक उद्योग घराण्यातील तरुण मुले स्वतःचे कर्तृत्व आणि वेगळेपण सिद्ध करण्यासाठी नवा मार्ग स्वीकारताना दिसतात.
इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे चिरंजीव रोहन नारायण मूर्ती या तरुणाने देखील असाच नवा मार्ग स्वीकारून एक उदाहरण घालून दिलेले आहे.
रोहनचे कुटुंब म्हणजे एक यशस्वी परिपूर्ण कुटुंब आहे. त्याच्या वडिलांनी अतिशय दूरदृष्टीने भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक अशा इन्फोसिस ची स्थापना करून ती नावारूपाला आणली. त्याची आई सुधा मूर्ती या नावाजलेल्या लेखिका आणि वंचित, उपेक्षित घटकांना मदत करण्यात कायम आघाडीवर असतात. त्याखेरीज रोहनची बहिण अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांची पत्नी आहे.
असे असतानाही रोहनने मात्र त्याचा वेगळा मार्ग निवडला असून अतिशय जिद्दीने आणि विचारपूर्वक त्याने सोरोको हे स्वतःचे स्टार्टअप 2014 मध्ये सुरू केले असून त्याच्या विस्तारात आणि यशस्वीतेत त्याचा मोठा वाटा आहे. रोहनचे बालपण आणि शिक्षण अतिशय सुरक्षित, पोषक तसेच पाठबळ देणाऱ्या कुटुंबात गेले. त्याचे शालेय शिक्षण बंगळूरच्या बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये झाले. त्याच ठिकाणी त्याच्या पुढील वाटचालीसाठी पायाभरणी झाली. नंतर त्याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स मधील पदवी संपादन केली.
पाठोपाठ हॉर्वर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधली पीएचडी संपादन केली. त्यानंतर त्याने टेक्निकल इनोवेशनच्या क्षेत्रात काम करण्याचे ठरवून स्वतःचा वेगळा मार्ग स्वीकारला. 2014 मध्ये त्याने अर्जुन नारायण आणि जॉर्ज निशिज या दोन संगणक तज्ञांना बरोबर घेऊन सोरोको या कंपनीची स्थापना केली. एकूण डिजिटल क्रांती घडत असताना त्या दृष्टीने व्यवसायाकडे कसे पाहावे, व्यवसाय करताना तंत्रज्ञान आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स वर कसे लक्ष केंद्रित करावे, याबाबतच्या कल्पनाच सोरोकोने बदलून टाकल्या. या स्टार्टअपमध्ये रोहनकडे सर्व तंत्रज्ञान विषयक काम आहे.
गेल्या काही वर्षात सोरोकोची लक्षणीय वाढ झालेली आहे आणि या 15 अब्ज डॉलर च्या बाजारपेठेतील ग्राहकांना जगभर सेवा देण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन सोरोकोने समोर ठेवले आहे. फोर्ब्जच्या माहितीनुसार सोरोकोने त्यांची रेवेन्यू विषयक आकडेवारी खुली केलेली नसली तरी नेल्सन हॉल वेंडर इवोल्युशन अँड असेसमेंटच्या अंदाजानुसार 2022 मध्ये स्वरूपाचा रेव्हेन्यू एक कोटी 80 लाख डॉलर पर्यंत पोहोचलेला होता.