बासेल – स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू आधुनिक जागतिक टेनिसचा सम्राट फेडेक्स नावाने ओळखला जात असलेल्या रॉजर फेडरर याने अखेर निवृत्ती जाहीर केली.
तब्बल 20 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा हा टेनिस जगताचा लाडका खेळाडू गेल्या काही काळापासून सातत्याने दुखापतींचा सामना करत होता. याच दुखापतींमुळे त्याला गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने विविध स्पर्धांमधून माघारही घ्यावी लागत होती. अखेर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. अत्यंत सुवर्ण कारकीर्दीची अशी निवृत्ती अवघ्या टेनिसविश्वाला धक्का दोणारी ठरली आहे. त्याने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात होत असलेली लेव्हर कप टेनिस स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा ठरणार आहे. कोर्टवरच निवृत्त होण्याचे त्याचे स्वप्न या स्पर्धेद्वारे पूर्ण होणार आहे. माझे कुटुंबीय, मीत्र, सहकारी खेळाडू व जगभरातील चाहते यांचा मी आभारी आहे, अशा शब्दात फेडररने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्याच्या या घोषणेनंतर त्याचे स्पर्धक स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोवाक जोकोवीच यांनी आपल्याला या वृत्ताने धक्का बसल्याचे सांगितले आहे. त्याच्याविरुद्धचा प्रत्येक सामना कायम स्मरणात राहिल. त्याचा खेळ पाहूनच आपल्याला प्रेरणा मिळाली व प्रत्यक्ष त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधीही मिळाली यासाठी आम्ही कायमच स्वतःला नशीबवान समजू, असे नदाल व जोकोवीच यांनी व्यक्त केले आहे.