पुणे – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली. गोल्फ चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, एकजण जखमी झाला आहे. शमीम खलील शेख (वय 42) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, सरोजुद्दीन अहमद (वय 33) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रक चालक गणेश शिवाजी रोमन याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
दुसरी घटना औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पीटल येथे जीप मागे घेताना झाली. या अपघातात तरूणाचा जीप खाली येऊन मृत्यू झाला. याप्रकरणी आता एका सुरक्षा रक्षकावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन काशिनाथ शिंदे (वय 26, रा. शिवरत्न कॉलनी, मोरया हाऊस, काळेवाडी) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर हॉस्पीटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या रोहीत किशोर तायडे (वय 21, रा. दर्शनपार्क सोसायटी, आंबेडकर चौक, औंध) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन शिंदे हा हाऊसकिपिंग सुपरवायझर म्हणून हॉस्पीटलमध्ये काम करत होता. तर रोहीत हा येथेच सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस आहे. येथे आलेली जीप पार्कीमध्ये पार्क करण्यासाठी मागे घेत असताना त्याला केतन मागे उभा असलेला अंदाज आला नाही. त्याने निष्काळजीपणे जीप रिर्व्हर्स घेऊन त्याच्या अंगावर घातली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या केतनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली सुळ करत आहे.