आळेफाटा/बेल्हे – आळेफाटा (ता. जुन्नर) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलीसांणी जेरबंद केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. नवनाथ राजू पवार (वय 21, रा. ढोकी, ता. पारनेर), अनिकेत बबन पवार (वय 20, रा. बोरी साळवाडी, ता. जुन्नर), अंकुश खंडू पवार, प्रवीण दत्तात्रय आंबेकर (वय 25, दोघे रा. तांबवाडी, वडगाव सावताळ, ता. पारनेर) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.
तर कैलाश शिंदे धोत्रे (ता. पारनेर), विशाल खंडू पवार (रा. तांबवाडी, वडगाव सावताळ) विकास बर्डे (लाखणगाव, ता. आंबेगाव) हे फरार झालेले आहेत. आरोपींकडून त्यांच्याजवळ असलेले लोखंडी हातोडा, चाकू, कोयता, स्क्रू ड्रायवर, कटर, नायलॉन रस्सी, चिकटपट्टी, टॉर्च, मिरची पावडर, मोबाईल हे साहीत्य मिळाले असून, सर्व जप्त केले आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (गुरूवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रघुनाथ शिंदे, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पद्मसिंह शिंदे हे रात्रगस्त करत असताना त्यांना कल्याण अहमदनगर मार्गावरील आळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बोरी फाटा या ठिकाणी आळेफाटा बाजूने ओमणी कार (एमएच 14 एजी 7203) संशयित भरघाव वेगाने जाताना आढळून आली.
कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती जोरात पुढे निघून गेली. पोलिसांनी या वाहनाचा वेगाने पाठलाग करून पकडले. या वाहनात असलेले सातजण अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. पोलिसांनी त्यांचा पुन्हा पाठलाग केला असता ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या चौघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता, आळेफाटा या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलो होतो, असे कबूल आहे. तर तिघे फरार झालेले आहेत.
विविध गुन्ह्यांची कबुली
यातील अंकुश खंडू पवार हा विविध गुन्ह्यांमध्ये 1 वर्षांपासून फरार आहे. अटक केलेल्या आरोपींची यापूर्वी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बोरी, बेल्हे, राजुरी, पिंपळवंडी, नळवणे या परिसरात केलेल्या 5 गुन्ह्यांची तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील 3 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांचाकडून या ठिकाणी चोरी केलेले चांदी, रोख रक्कम, टीव्ही, तसेच इलेक्ट्रिक मोटार व त्यातील कॉपर असा 3 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे.