मुंबई : डॅनियल सॅम्सने केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर तिलक वर्माने केलेल्या खेळीच्या मदतीने मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून सहज विजय मिळविला. चेन्नईच्या 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 5 विकेट गमावल्या आणि 31 चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. तर रोहित शर्माने 18 धावा केल्या. मुंबईच्या विजयासह चेन्नईचा संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
सुख. 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #CSKvMI @TilakV9 @timdavid8 pic.twitter.com/Ly5SS63Spu
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरविला. मुंबईचा डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने पहिल्याच षटकांत चेन्नईला दोन धक्के दिले. यानंतर बुमराहने दुसऱ्या षटकात आणखी एक विकेट घेतली. यामुळे चेन्नईची अवस्था 5 धावांत 3 बाद अशी झाली.
कॉन्वे, मोईन अली आणि महेश तीक्षणा शून्यावर बाद झाले. इतरही खेळाडू खास कामगिरी करु शकले नाहीत. पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकहाती अखेरपर्यंत झुंज देत संघाला किमान 97 धावांपर्यंत पोहोचवले. धोनीने 33 चेंडूत नाबाद 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीने 4 चौकार आणि 2 षटकार यावेळी ठोकले. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी 2-2, तर जसप्रीत बुमराह आणि रमणदीप सिंग यांनी 1-1 विकेट घेतली.