Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री कामगार झोपेत असताना ही आग लागली. यात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील असून इतर 4 कामगारांना आपला जीव वाचवणात यश मिळाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. यातील 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सर्व कामगार झोपलेले असताना काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आल्यानंतर त्यांना आग लागल्याचं दिसले. यानंतर कामगारांची एकच पळापळ सुरु झाली. ही आग कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच लागल्याने बाहेर पडणे अवघड झाले होते. मात्र यातील काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर वाळूज अग्निशमन दलाचे दोन बंब, बजाज ऑटो कंपनीचा एक, महापालिकेचे दोन व चिकलठाणा अग्निशमन दलाचा एक अशा ६ बंबांसह वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला आतमध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख, कौशर शेख, इक्बाल शेख, ककनजी, रियाजभाई, मरगुस शेख) या कामगारांचा मृत्यू झाला आहे.