पिंपळे गुरव, दि. 28 (वार्ताहर) -पिंपळे निलख येथून बाणेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच रक्षक चौक ते पिंपळे निलख हा रस्ता देखील खड्डेमय बनला आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांना तात्पुरती मलमपट्टी करून देत आहेत. प्रशासन बिले मंजूर करत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावर पुणे, बाणेर तसेच पिंपळे निलख परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. एक महिन्यापूर्वी नागरिकांच्या तक्रारीवरून प्रशासनाने डांबरीकरण करून खड्डे बुजविले. त्याला एक महिना होतो ना होतो पुन्हा झालेल्या पावसाने डांबरीकरण केलेले डांबर वाहने जाऊन रस्ता उखडला गेला आहे. महापालिकेने येथील रस्त्याचे खड्डे बुजविले. परंतु पहिल्या पावसात बुजविलेले खड्डे दुसऱ्या पावसात उखडल्याने रक्षक चौक ते पिंपळे निलख आणि बाणेरकडे जाणारा पुन्हा खड्डेमय बनला आहे. पालिका नागरिकांसाठी काम करत आहे की ठेकेदार पोसण्याचे काम करत आहे, असा प्रश्न नागरिक करत आहेत.
ठेकेदारांकडून निकृष्ट काम
पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी निवेदा काढून रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करत आहे. हे ठेकेदार केवळ खडी, मुरूम आणि वासापुरते डांबर वापरून खड्डे बुजवित आहेत. त्यामुळे एक महिन्याच्या आत पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन ठेकेदारांनी केलेल्या कामावर लक्ष ठेवते की केवळ पैशांचे वाटप करते असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पिंपळे निलख परिसरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम मागील काही दिवसांपूर्वी महापालिकेने केले. परंतु पहिल्या पावसानंतर बुजविलेले खड्डे दुसऱ्या पावसात जैसे-थे झाले. ठेकेदाराने बुजविलेल्या खड्ड्यांची पाहणी पालिका प्रशासनाने करणे अपेक्षित होते. तर महिन्यात खड्डे उखडले जात असतील तर पालिका प्रशासन व ठेकेदार मिळून जनतेचा कररुपी पैसा लुटत आहेत. अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. – प्रदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते.