चिखली, दि. 16 (वार्ताहर) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने शहरातील ड्रेनेजलाइन, स्ट्रॉर्म वॉटरलाइन, सांडपाणी वाहिनी आदी विकासकामे करण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिकेकडे शहर अभियंते तसेच शहरातील विकासकामांसाठी सल्लागार नियुक्त करून देखील विकासकामे नियोजनपूर्वक होत नसल्याने शहरातील रस्ते जलमय होऊन नागरिक त्रस्त आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील कृष्णानगर प्रभाग क्रमांक 11 मधील पेठ क्रमांक 18, महात्मा फुलेनगर येथे पदपथाचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु या पदपथाखालून महापालिकेच्या वतीने स्ट्रॉर्म वॉटरलाइन टाकण्यात आली आहे. हे पदपथ रस्त्यापेक्षा जास्त उंचीवर असल्याने या स्ट्रॉर्म वॉटरलाइनचे चेंबर देखील रस्त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.
त्यामुळे रस्त्यातील पाण्याचा निचरा पूर्णपणे होत नसून पाणी रस्त्यात साचून राहत आहे. स्ट्रॉर्म वॉटर लाइन रस्त्यातून टाकणे अपेक्षित होते. परंतु ती रस्त्याच्या एका बाजूला आणि रस्त्यापेक्षा जास्त उंचीवर टाकल्याने रस्त्यातून वाहणारे पाणी स्ट्रॉर्म वॉटरलाइनमध्ये जात नाही. परिणामी फुलेनगर येथील रस्ते जलमय झाले आहे