सातारा – आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील ‘ब’ वर्ग सहाय्यक गटविकास अधिकार्यांच्या बदल्या शुक्रवारी (दि. 16) केल्या. यामध्ये जिल्ह्यातील दोन अधिकार्यांचा समावेश असून, जिल्ह्यात दोन नवे सहाय्यक गटविकास अधिकारी येणार आहेत. पाटण येथे अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अधिकार्यांच्या बदल्यांची मोहीम राबवली आहे. त्यात ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये शुक्रवारी (दि. 16) ‘ब’ वर्गातील दहा सहाय्यक गटविकास अधिकार्यांचा समावेश आहे.
यामध्ये कोरेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गोपाळा गावडे यांची शिराळा (जि. सांगली) येथे, तर पाटण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत शिवराम वाघ यांची शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथे बदली करण्यात आली आहे. शिराळा येथील अजिंक्य कुंभार यांची कोरेगाव येथे, तर विटा (जि. सांगली) येथील एम. एच. माडगूळकर यांची खटाव (वडूज) येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.