पहिल्याच पावसात रस्त्यांची वाट

सातारा पालिकेचे दुर्लक्ष : खड्ड्यांचे साम्राज्य वाढले, नागरिकांमध्ये संताप
संदीप राक्षे

पुन्हा खड्ड्यांचा अनुभव

सातारा पालिकेच्या शहरातील बहुतांश रस्त्यांची दोन वर्षांपूर्वी कामे करण्यात आली. याही रस्त्यांची सध्या वाट लागल्याने या कामांबाबत साशंकतेने पाहिले जात आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीवेळी निधीची बरीच फिरवाफिरवी झाली. त्यामुळे रस्त्यांची कामे नगरपालिकेने की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली? असे प्रश्‍न आहेतच. रस्ते खोदताना दुरुस्तीसाठी त्याच योजनेत तरतूद असल्याचे प्राधिकरणाचे त्यावेळी म्हणणे होते. तरीही नगरपालिकेने या दुरुस्तीसाठी 28 लाख दिले होते. हे काम प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पण काम होत नसल्याने कामासह हा निधी पुन्हा पालिकेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्त्यांची कामे झाली. वॉर्डमध्ये कामे करताना बऱ्याच रस्त्यांची कामे रखडली. त्यानंतर नगरपालिकेने पुन्हा स्वनिधीतून रस्त्यांची कामे हाती घेतली. या साऱ्या प्रक्रियेत सावळा गोंधळ झाला. रस्त्यांची संपूर्ण कामे झाली नाहीत. अर्धवट कामे करून त्याची बिले मात्र निघाल्याचे काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. या परिस्थितीमुळे दोन वर्षांत पुन्हा खड्ड्यांचा अनुभव सातारकरांना येवू लागला आहे.

सातारा  – सातारा शहराच्या विकासात राजपथासह इतर अठरा रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच दणक्‍याने रस्ते उखडल्याने कामाच्या दर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासदारांनी समाजकारणाचा टॉप गियर टाकला तरी यातून पदाधिकाऱ्यांनी काहीच बोध घेतला नाही. साताऱ्यातील रस्त्यांची गेली आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वाट लावली. खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने साताऱ्यातील रस्त्यांवर जणू आभाळच कोसळलं. “ऊंट की सवारी’चा अनुभव येत असताना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सातारा शहरात 700 कोटींची कामे केल्याची चर्चा लोकसभा निवडणुकांमध्ये ऐकायला मिळाली. मात्र, रस्त्यांची कामे कुठे झाल्याचे निदर्शनास येत नसल्याने हा निधी कुठे खर्च झाला म्हणून पोलिसात एफआयआर दाखल करण्याची तयारी दाखवली गेली. कोट्यवधींची कामे कुणी दाखवली नाहीत आणि एफआयआर पण दाखल झाला नाही, असो. पण त्यानंतर शहरात 100 कोटींचे म्हणजे अब्जावधींचे रस्ते केले जाणार असल्याचे सुतोवाच केले गेले. त्यामध्ये शहरातील राजपथ, कर्मवीर पथ (खालचा रस्ता), बोस चौक-जुना आरटीओ चौक व अन्य दोन रस्ते अशा पाच प्रमुख रस्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले गेले. मात्र, शहरातील विकास साधण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या योजना परस्परांवर अवलंबून आहेत, हे कुणीच सांगितले नाही. शहरात भुयारी गटर योजना प्रस्तावित होती. त्याच योजनेने साताऱ्यात बत्तीस किलोमीटरची वाट लावली.

कामाच्या निकृष्ट दर्जामुळे नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने भुयारी गटर योजना अजून अपूर्ण आहे. ही योजना साकारत असताना वाढीव पाणीपुरवठा योजना राबवली. पाच वर्षांपूर्वीच तिची मुदत संपली. जी गेली दहा वर्षांपासून सुरूच आहे. त्यातील भाग म्हणजे कास धरणाची उंची वाढवणे आहे. ही कामे मार्गी लागणार नाहीत, तोपर्यंत भुयारी गटर योजनेचे काम पूर्ण होणार नाही. कारण योजनेचे जेवढे काम तेवढाच निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. भुयारी गटरचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत 100 कोटींच्या रस्त्यांची कामे चर्चेतच राहणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी योजनांना स्वनिधी उपलब्ध करून देताना सातारा पालिकेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याचा रस्ते दुरुस्तीसारख्या कामांवरही परिणाम होत आहे. साताऱ्यात पोवई नाका, भूविकास बॅंक, समर्थ मंदिर चौक, कोटेश्‍वर पूल, बाबर कॉलनी, कर्मवीर कॉलनी गंमत जंमत मार्केट यार्ड परिसर सह अन्य भागांची स्वतंत्र दुरुस्तीची अंदाजपत्रके बनवण्याची वेळ आली आहे. अंदाजपत्रकात साईडपट्ट्यांसाठी केवळ वीस लाखाची तरतूद आहे. मात्र यूडी 6 किंवा चौदाव्या वित्त आयोगाचे प्रस्ताव मात्र सध्या थांबलेलेच आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)