शिक्षणाच्या नावाखाली खासगी क्‍लासेसचा सुळसुळाट

सुरेश डुबल
कराड, पाटण तालुक्‍यातील विदारक चित्र : पालकांची सुरू आहे आर्थिक लूट

शिक्षकांकडून पालकांनाच भीती

तुमचा पाल्य अभ्यासात हुशार नाही, त्याचे भवितव्य चांगले नाही, त्याला खासगी क्‍लास लावा नाही तर इतर मुलांच्या तुलनेत तो शिक्षणात मागे राहील. अशा पद्धतीची भीती शिक्षकांकडून पालकांना घातली जात आहे. तसेच यासाठी तुम्ही त्याला अमुक अमुक यांच्या क्‍लासमध्ये पाठवा, असे म्हणत क्‍लासेस लावण्यासाठी त्यांच्यावर दबाव देखील आणला जात आहे. यासाठी शिक्षकांची साखळी असल्याचेही काही पालकांचे म्हणणे आहे.

कराड – आपल्या पाल्याने उच्च शिक्षण घ्यावे, प्रगती करावी असे प्रत्येक पालकांना वाटत असते. यासाठी आपल्या पाल्याला चांगल्यातले चांगले शिक्षण देण्यासाठी पालक धडपडत असतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत खासगी क्‍लासचालकांनी दुकानदारी सुरू केली असून त्याचे परिणाम स्वरूप शिक्षणाच्या नावाखाली खासगी क्‍लासेसचा कराड व पाटण तालुक्‍यात सुळसुळाट झाला आहे.

शालेय शिक्षण पद्धतीवर बऱ्याच वेळा तुलनात्मक शिक्षण कशाप्रकारे घेतले जाते. याबाबत सरकारी व खासगी शाळांमध्ये चढाओढ लागलेली असते. यात खासगी शाळांनी सरकारी शाळांवर मात केल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नेमका याचाच परिणाम पालकांमधून पाल्यांना सरकारी शाळेत न घालता खासगी शाळेत घालण्याची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये भरमसाठ फी, वेगवेगळ्या इव्हेंटच्या नावाखाली पैसे गोळा करणे असे प्रकार सर्रास सुरू असतात. यात आता खासगी क्‍लासेसची भर पडली आहे. जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवण्यास आहेत, तेच शिक्षक खासगी क्‍लास उघडून बसले आहेत. यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने खासगी क्‍लासेसचा सुळसुळाटच झाला आहे.

पालकांनी आपल्याच क्‍लासला विद्यार्थ्यांना घालावे. यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न होत आहेत. जो शिक्षक शाळेमध्ये शिकवतो, तोच शिक्षक खासगी क्‍लास घेऊन देखील तोच विषय अन्‌ त्याच विद्यार्थ्यांना शिकवतो. असा हास्यास्पद प्रकार सध्या सुरू आहे. तुमच्या मुलाला शाळेत काही येत नाही, तुम्ही त्याला माझ्या खासगी क्‍लासला पाठवा असे थेट पालकांना सांगणाऱ्या शिक्षकांमुळे शिक्षणाची गंगा नेमकी उलटी वाहत असल्याचा प्रत्यय येत आहे. असे प्रकार होत असताना या क्‍लासेसवर नियंत्रण कोणाचे आहे की नाही? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. याकडे शिक्षण विभाग गांभीर्याने बघत नसल्याचे दिसून येत आहे.

खासगी क्‍लासेस काढून शाळांची मापे काढणाऱ्या अशा शिक्षकांमुळे शाळांची गुणवत्ता ढासळत आहे. मुलांनी खासगी क्‍लास लावावेत. यासाठी शाळेत आवश्‍यक व दर्जेदार शिक्षण त्या-त्या शिक्षकांकडून दिले जात नाही. मात्र तेच शिक्षण चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न खासगी क्‍लासच्या माध्यमातून केला जात आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. शिक्षण विभागात पदरमोड करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक देखील आहेत. मात्र काही बोटांवर मोजणाऱ्या अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे.

त्याशिवाय दिवसरात्र काबाडकष्ट करून दोन पैसे कमावून आपल्या पाल्याला चांगले शिक्षण द्यायचे. यासाठी पैसे कमावणारे पालकांची देखील अशा शिक्षकांकडून लुबाडणूक होत आहे. यावर शासनाने योग्य ती पावले लवकरात लवकर उचलणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात शाळा कमी क्‍लासेस जास्त होऊन विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होतच राहील हे मात्र निश्‍चित.

Leave A Reply

Your email address will not be published.