स्थायीची मंजुरी : प्रत्येक किलोमीटरला 25 हजार खर्च
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यांच्या अपघात प्रवण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने रोड सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. हे ऑडिट आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत केले जाणार आहे. त्यासाठी विद्यालयाला प्रति किलोमीटर 25 हजार रुपये दिले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रस्त्यांबाबत उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डीआयएमटीएस) या संस्थेने विविध शिफारशींचा अंतर्भाव करून रस्ता सुरक्षा संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर केला होता. या समितीने अहवालातील शिफारशी स्वीकारल्या आहेत. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील विकास आराखड्यातील विकसित केलेल्या 18 मीटर आणि त्यावरील रुंदीच्या रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्रासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात येणार आहे. या रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करणे आवश्यक आहे.
महापालिकेमार्फत आयआयटी मुंबई, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी आणि पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना 7 मे 2019 रोजी पत्रव्यवहार करण्यात आला. रोड सेफ्टीसाठी त्यांच्याकडून दर मागविण्यात आले. त्यानुसार, आकुर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आयआयटी मुंबई यांचे दर प्राप्त झाले.
पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून दर प्राप्त झाले नाही. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने 25 हजार अधिक कर असा प्रति किलोमीटर दर सादर केला. दा दर आयआयटी मुंबईच्या दरापेक्षा लघुत्तम असल्याने तो स्वीकारण्यात आला. त्यानुसार रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यासाठी प्रति किलोमीटर 25 हजार रुपये दराने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.