पिंपरी – पाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात “लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दररोजच्या कामाचा कालावधी वाढला असल्याने त्यानुसार कर्मचाऱ्यांनी कामाची वेळ पाळावी, या दृष्टीने शिस्तीचा बडगा उगारण्यात आला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, प्राधिकरणात 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी कार्यालयाची वेळ करण्यात आली आहे. कामाची वेळ वाढली असल्याने कर्मचारी नवीन वेळेनुसार सकाळी हजर राहत आहेत का?, तसेच सायंकाळी वाढविलेल्या वेळेनुसार घरी जात आहेत का, याची तपासणी केली जात आहे. त्यासाठी दोन्ही वेळेला कर्मचाऱ्यांचे होणारे थम्ब पंचिंग तपासले जात आहे. सलग तीन दिवस उशीर झाल्यास एका दिवसाची रजा कपात केली जात आहे. त्यामुळे “लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ पाळण्यासाठी चांगलीच धांदल उडत आहे.
प्राधिकरणात सध्या 78 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्याशिवाय, 70 कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेले आहे. कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 15 निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासन निर्णयानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव असल्याने निवृत्तीनंतर देखील त्यांना प्राधिकरण सेवेत घेतले आहे.
प्राधिकरणात पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयाचा प्राधिकरणातील सर्व कर्मचाऱ्यांना फायदा मिळत आहे. तथापि, नव्याने वाढविलेल्या वेळेनुसार कर्मचारी वेळेवर हजर राहत आहेत का, याची दररोज तपासणी केली जात आहे.
– आशाराणी पाटील, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण