पुणे – पुणे-सातारा महामार्गाचे काम रखडल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड व स्थानिक वाहनधारकांना खेड शिवापूर टोलमधून सूट देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, टोलसाठी अरेरावी केली जात असून, वसुली केली जात आहे, अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे टोल वसूल करू नये, टोलनाका हलवावा, आदी मागण्यांसाठी टोलविरोधी कृती समितीने आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर आणि हवेली तालुक्यातील वाहनांकडून टोल वसूल करु नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश डावलण्यात येत आहेत.
तक्रारदार विलास लेले हे दि.1 मार्च रोजी चारचाकी वाहनाने पुण्याहून रत्नागिरीला जात होते. त्यावेळी खेडशिवापूर टोलनाक्यावर त्यांच्याकडून 95 रुपये टोल वसूल करण्यात आला. त्याच दिवशी रात्री परतेवेळी पुन्हा त्यांना टोलसाठी थांबवण्यात आले. यावेळी लेले यांनी टोल देण्यास नकार दिला. त्यामुळे कामगारांनी लेले यांच्याशी वाद घातला. ज्या वाहनांना टोलमधून सुट आहे, त्यांच्याकडून वसुली बंद करावी, तसेच वसुली करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी लेले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.