पुणे, दि. 9 -शहरातील वाहतूक कोंडीसाठी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी महामेट्रोकडे बोट दाखविल्यानंतर महामेट्रोकडून शहरातील रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. याशिवाय ज्या रस्त्यांवर मेट्रोच्या व्हाया डक्टचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांवरचे बॅरिकेडींग कमी करून रस्तेही वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट (17.4 किमी) आणि वनाज ते रामवाडी (15.7 किमी) असे मेट्रोचे एकूण 33 किमीचे दोन मार्ग असून, त्यातील 25 किमी मार्ग उन्नत, तर 6 किमी मार्ग भुयारी आहे. यातील बहुतांश काम रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांच्या जागी करण्यात आले असून, या कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. तसेच यावर्षी झालेल्या मोठया पावसामुळे त्याच्यात भर पडली आहे. मेट्रो वेळोवेळी रस्ते दुरुस्त करीत आली आहे. रस्त्यांवरचे खड्डे, ड्रेनेजची दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, पाइपलाइनची दुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती ही कामे महामेट्रोकडून करण्यात येत आहेत.
272 वॉर्डनची नियुक्ती
महामेट्रोकडून शहरात 272 ट्रॅफिक वॉर्डन शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तैनात ठेवले आहेत. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट, गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि आरटीओ ते रामवाडी येथे वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे काम करीत आहेत. या शिआय मेट्रोने या मार्गांवर जलद कृती दल तैनात केली आहे. जलद कृती दल या मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या रस्त्यांवर दुर्घटना झाल्यास मदतीसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू
बोपोडी एल्फिस्टन रस्ता ते एमईसीबी चौक
एल्फिस्टन रस्ता ते रेल्वे क्रॉसिंग रस्ता
खडकी पोलीस स्टेशन ते रेल्वे अंडरपास
रेल्वे अंडरपास ते साई मंदिर चौक
वनाज ते गरवारे महाविद्यालय परिसर