पुणे, दि. 9 -शहरात यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेच्या मुख्य खात्याने गेल्या तीन वर्षांत डांबरीकरण तसेच कॉंक्रिटीकरण केलेल्या 139 रस्त्यांची तपासणी केल्यानंतर 10 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली. हे सर्व रस्ते 12 मीटरच्या पुढील रुंदीचे होते. मात्र, 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या आणि पावसाळ्यात अक्षरश: उखडून गेलेल्या शेकडो रस्त्यांची कामे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून गेल्या तीन वर्षांत करण्यात आली असून, या कामांची यादीच क्षेत्रीय कार्यालयांकडे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
खराब झालेल्या 12 मीटरच्या आतील रस्त्यांच्या कामांची यादी गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा क्षेत्रीय कार्यालयांना मागण्यात आली असून, ही यादी मिळत नसल्याने क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. मात्र, त्यानंतरही ही माहितीच दिली जात नसल्याने क्षेत्रीय कार्यालयांनी कामे केलेले रस्ते गेले कुठे, असा प्रश्न पडला आहे.
पुन्हा दोन दिवसांचा अल्टिमेटम
शहरात पावसाळ्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून 12 मीटरच्या आतील रस्त्यांची तुकड्या-तुकड्यात अथवा सगळा रस्ताच करत काम करण्यात येते. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या धर्तीवर अशी कामे निविदा काढून केली जातात. शहरातील एकूण 1400 किलोमीटरचे रस्ते असून, त्यात जवळपास 900 कि.मी.पेक्षा अधिकचे आहेत. क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कामे केल्यानंतर या कामांना तीन वर्षांचा दोष दायित्व कालावधी असतो. त्यामुळे यावर्षी मुख्य रस्त्यांची अवस्था बघता 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची अवस्था वाईट होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या कामांच्याही तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी पाच वेळा क्षेत्रीय कार्यालयांकडे या कामांची माहिती मागितली. मात्र काही क्षेत्रीय कार्यालये ती देतच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरंच रस्त्यांची कामे झाली, की केवळ ती कागदावर दाखविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातशे कामांची तपासणी
दरम्यान, आतापर्यंत क्षेत्रीय कार्यालयांनी 2200 कामांची यादी मुख्य खात्यास सादर केली आहे. त्यातील 700 कामांची तपासणी करण्यात आली असून, 25 ते 30 ठेकेदार दोषी आढळले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक कामे असून, त्या कामांची यादी तसेच काम खराब झाल्याने ठेकेदारांवर करण्यात आलेली कारवाईची माहिती पुन्हा एकदा क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी कुलकर्णी यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालयांकडून गेल्या तीन वर्षांतील कामांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो महापालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आला आहे. तसेच त्यांना शेवटच्या दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतरही माहिती न आल्यास कडक कारवाई केली जाईल.
– डॉ. कुणाल खेमनार,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका