पुणे – पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर कायमच वाहतूक कोंडी होत असते. सध्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि कॅबमुळे यात भर पडली आहे. वाहतुकीसाठी कमी रस्ता उपलब्ध होत असल्याचे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या पुणे स्टेशन येथील रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकींसह रिक्षा, एसटी, पीएमपी बसेस आदींची ये-जा असते. त्यामुळे परिसरात कायमच वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात.
पुणे रेल्वे स्थानकातून नियमित 200 गाड्यांची ये-जा असायची. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची स्थानक आवारात ये-जा असायची.
सध्या करोना पार्श्वभूमीवर केवळ विशेष गाड्या सुरू असल्याने तुलनेने गाड्या आणि प्रवासी संख्या कमी आहे. परंतु, अद्यापही परिसरातील वाहतूक कोंडी कायम आहे. सध्या स्थानकाबाहेर उभी राहणारी प्रवासी वाहने या कोंडीत भर घालत आहेत.