पुणे रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर कायमच कोंडी : वाहनांच्या रांगा
पुणे – पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर कायमच वाहतूक कोंडी होत असते. सध्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि कॅबमुळे यात आणखी भर पडली आहे. वाहतुकीसाठी कमी रस्ता उपलब्ध होत असल्याचे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या पुणे स्टेशन येथील रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकींसह रिक्षा, एसटी, पीएमपी बसेस आदींची ये-जा असते. त्यामुळे परिसरात कायमच वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. पुणे रेल्वे स्थानकातून नियमित 200 गाड्यांची ये-जा असायची. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांची स्थानक आवारात ये-जा असायची.
सध्या करोना पार्श्वभूमीवर केवळ विशेष गाड्या सुरू असल्याने तुलनेने गाड्या आणि प्रवासी संख्या कमी आहे. परंतु, अद्यापही परिसरातील वाहतूक कोंडी कायम आहे. सध्या स्थानकाबाहेर उभी राहणारी प्रवासी वाहने या कोंडीत भर घालत आहेत.
पुणे स्टेशनवर ये-जा करणारे नागरिक पिकअप आणि ड्रॉपअपचा पर्याय अवलंबतात. पूर्वी पहिल्या क्रमांकाच्या गेटमधून ही वाहने आत येऊन प्रवाशांना सोडून चौथ्या क्रमांकाच्या गेटमधून बाहेर पडायची. मात्र, करोना पार्श्वभूमीवर गेट बंद केले असून, पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी तिसऱ्या क्रमांकाचे गेट खुले केले आहे. मात्र, प्रवाशांना सोडवण्यासाठी येणाऱ्या रिक्षा, टॅक्सी स्थानकाच्या दारातच उभी राहात असून, यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
करोना पार्श्वभूमीवर गेट बंद राहणार आहे. प्रवाशांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत यावे, तर ताडीवाला रस्त्याच्या गेटमधून बाहेर जाण्याची व्यवस्था केली आहे. यासह पिकअप आणि ड्रॉपच्या सोयीसाठी तिसऱ्या क्रमांकाच्या गेटच्या एका लेनमधून आत आणि दुसऱ्या लेनमधून बाहेर जाता येते.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग