पुणे – प्रवासी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वारगेट पोलिसांनी महिला सहायक कक्ष या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. रात्रीच्यावेळी रिक्षातून किंवा कॅबने घराकडे यायला निघालेल्या प्रवासी महिलांच्या मदतीसाठी बसस्थानक परिसरात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलिसांनी तब्बल 250 रिक्षा चालकांची संपूर्ण माहिती जमा केली आहे. त्यांचा एक व्हॉटस्ऍप ग्रुप तयार केला असून, पोलिस त्यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्या कामावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
वानवडी परिसरात रिक्षा चालकाने अभियंता महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यानंतर, पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. यापुढे, असे प्रकार घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. स्वारगेट बसस्थानक हे शहरातील महत्त्वाचा प्रवासी थांबा आहे.
रात्री उशिरापर्यंत नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने महिला, तरुणी येथे प्रवास करतात. त्यामुळे एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे, पोलीस उपनिरीक्षक आर.आर.पाटील,किर्ती चाटे या उपक्रमाचे काम पाहत आहेत.
महिला अधिकाऱ्यांचा पुढाकार
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील दोन दिवसांपूर्वी रात्रीपाळी कर्तव्यावर होत्या. एका जेष्ठ महिलेने त्यांना घरी सोडण्यासाठी मदत मागितली. त्यांनी तत्काळ एका रिक्षाचालकाला सूचना देवून त्यांना घरी सोडण्यास सांगितले. आपला वैयक्तीक मोबाईल क्रमांक देऊन घरी पोहचल्यास फोन करण्यास सांगितले. महिलेने घरी सुखरुप पोहचताच फोन करून पाटील यांना कळवून मुली, आम्हाला आमची मुले कधी विचारत नाहीत. तू लगेच मदत करून आस्थेवाईकपणे चौकशी केलीस. खुप बरे वाटले, असे भावनिक उद्गार पोलिसांच्या कामाबद्दल काढले.
सुरक्षित प्रवासासाठी…
एखादी प्रवासी महिला रिक्षातून किंवा कॅबमधून एकटी प्रवास करत असेल तर पोलिसांकडून त्या रिक्षा किंवा कॅबला थांबवून चालकांचा संपर्क क्रमांक, वाहन परवाना, नाव आणि पत्ता घेतला जातो. त्याच बरोबर प्रवासी महिलेचा देखील संपर्क क्रमांक पोलिस घेतात. निर्धारित प्रवासी भाड्याबद्दल त्याला सांगितले जाते. कक्षातील रजिस्टरमध्ये याबाबत नोंद केली जाते. महिला पोलीस प्रवासी तरुणीच्या संपर्कात राहून घरी पोहचल्यानंतर कॉल करून सुरक्षित प्रवासाबाबत विचारणा करतात. तसेच कॅब आणि रिक्षाचालकाला योग्य त्या सूचना दिल्या जातात.