मुझफ्फराबाद, (पाक व्याप्त काश्मीर) – मुजप्फराबाद शहरातील तुरुंगात कैद्यांमध्ये झालेल्या दंगलीमध्ये किमान 6 पोलीस आणि 2 कैदी जखमी झाले आहेत. तुरुंगातील काही कैदी तुरुंगात अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत असल्याचे समजले होते.
तसेच तुरुंगात मोबाईल फोन आणला गेला असून काही घातपाती कारवायांचे सूत्रसंचालन तुरुंगातूनच केले जात असल्या3चेही समजले होते. त्यासंदर्भात तुरुंग प्रशासनाने कैद्यांची झडती आणि तपासणी करायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान संतप्त झालेल्या कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर ही दंगल सुरू झाली, असे पाकिस्तानातून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
कैद्यांकडून पोलिसांना रात्री 9 वाजेपर्यंत मारहाण केली जात होती. तुरुंगाच्या बराकीच्या मोडलेल्या खिडक्या आणि दरवाज्याच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कैद्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यावर प्रशासनाने ही तपासणी काही काळासाठी थांबवली. कैद्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापरही करावा लागला.
बॅरेकमधून तब्बल 29 मोबाईल फोन, मोठ्या प्रमाणात लाकडी आणि स्टील रॉड, 40 एलपीजी सिलिंडर आणि इतर बंदी असलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.