एका अतिरिक्तावर तिघांचा भार : पवार हाकताहेत गाडा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन अतिरिक्त आयुक्तपदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीत महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची बदली व प्रवीण तुपे यांच्या निवृत्तीनंतर दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची पदे रिक्त आहेत. तर, तिसरे अतिरिक्त आयुक्त अजित पवार प्रभारी असून सद्यस्थितीत ते महापालिकेचा तिन्ही पदांचा कार्यभार स्वीकारून पालिकेचा गाडा हाकत आहेत.
राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ब वर्गामध्ये केला. त्यानुसार एकूण 11 हजार 571 एवढी पदे प्रस्तावित केली. त्यापैकी वर्ग 1 व वर्ग 2 मधील आणि अत्यावश्यक सेवांची काही पदे भरण्यास मान्यता दिली. त्यामध्ये महापालिकेला एक अतिरिक्त आयुक्त असताना तीन पदे मंजूर झाली. त्यापैकी दोन प्रतिनियुक्तीवरील, तर एक पालिका अधिकाऱ्यांमधून नियुक्त केला जातो.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त एक संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त दोन अजित पवार हे दोन प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त कार्यरत होते. तर, प्रवीण तुपे यांना पालिका अधिकाऱ्यांमधून बढती दिली होती. मात्र, संतोष पाटील यांची नुकतीच बदली झाली. तर, प्रवीण तुपे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची पदे रिक्त आहेत. तर अतिरिक्त आयुक्त अजित पवार हेच तिन्ही पदांचा कारभार हाकत आहेत.
कोणाची वर्णी लागणार
महापालिका अधिकाऱ्यांमधून एका अतिरिक्त आयुक्तांचे पद भरण्यात येणार आहे. हे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अधिकारात आहे. ते प्रभारी अधिकार सोपवू शकतात. प्रवीण तुपे यांच्यानंतर पालिका अधिकाऱ्यांपैकी उपायुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर आणि नगरसचिव उल्हास जगताप यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यापैकी कोणाला या पदाचा अतिरिक्त पदभार मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.