मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी नेते नवाब मालिक यांच्या जावयाचे नाव समोर येत आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनंतर या प्रकरणात आता एनसीबीने अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. दियाचा माजी व्यवस्थापक रहिला फर्नीचरवालासह त्याची बहिण आणि ब्रिटीश व्यावसायिक करण सजदानीलाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एनसीबीने 200 किलोग्रॅम गांजाही जप्त केला आहे. या तिघांच्या चौकशीत नवाब मलिक यांच्या जावई समीर खान समोर आले आहे.
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले होते. समीर खान आणि करन सजदानी यांच्यामध्ये २ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
एनसीबीने म्हंटले कि, समीर खान आणि करन सजदानी यांच्यामधील २ हजार रुपयांचा व्यवहार ड्रग्जप्रकरणी झाला असल्याचा आम्हाला संशय आहे. याची पडताळणी करण्यासाठी समीर खान यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीकडून अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. यात दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान, अर्जुन रामपाल यांचा समावेश आहेत. गांजा बाळगण्याप्रकणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती.