ठाणे – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गृहनिर्माण संस्थेकडून लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत अधिकाऱ्याने नवी मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडे 7/12 उताऱ्यामध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली होती, असे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाटाघाटीनंतर या अधिकाऱ्याने लाचेची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत खाली आणली, त्यानंतर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसीबीच्या नवी मुंबई युनिटशी संपर्क साधला, आणि त्यांच्याकडे या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने पनवेल शहर पोलिस ठाण्यात संबंधीत महसूल अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गृहनिर्माण संस्थांना अलिकडच्या काळात अशा स्वरूपाच्या अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांनी लाच घेण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे.