हिंगोली – जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपच्या सर्वेक्षणासाठी 4 हजाराची लाच घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला आज बुधवारी (दि. 3 एप्रिल) सायंकाळी रंगेहात पकडले. लक्ष्मीकांत बिजलगावे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत लाचपुत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एका शेतकऱ्यास शेतात सोलर पंपाची उभारणी करायची होती. त्यासाठी त्यांनी विज वितरण कंपनीकडे रीतसर अर्जही केला होता. त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणासाठी त्यांनी विज वितरण कंपनीचे कर्मचारी लक्ष्मीकांत बिजलवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र लक्ष्मीकांत याने त्यासाठी सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीने 4 हजार रुपये देण्याचे ठरले. सदर रक्कम आज कुरुंदा येथे देण्याचेही ठरले होते. मात्र संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाचलुच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
यावरून उपधिक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रवि वर्णने, राजाराम फूफाटे, शेख अखबर यांच्या पथकाने आज सायंकाळी कुरुंदा येथील टी पॉईन्टवर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लक्ष्मीकांत बिजलवार यांनी चार हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी हिंगोलीच्या लाचलूचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा, असे आवाहन हिंगोली जिल्ह्यातील लाचलूचपुत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी संपर्क –
डॉ. राजकुमार शिंदे ,पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. नांदेड परिक्षेत्र, नांदेड मोबाईल नंबर – 9623999944
अनिल कटके, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, हिंगोली मोबाईल नंबर – 9870221379
कार्यालय दुरध्वनी – 02456-223055, टोल फ्रि क्रं. 1064