पुणे – खरेदी केलेले सामान ठेवण्यासाठी दिलेल्या कॅरीबॅगचे पैसे आकारणाऱ्या स्टार सिटी प्रा. लि. च्या स्टोअर मॅनेजरला ग्राहक आयोगाने कॅरीबॅगसाठी आकारलेले 19 रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश दिला. पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला आहे. कॅरीबॅगची रक्कम 19 रुपये 8 सप्टेंबर 2019 पासून 9 टक्के दसादशे व्याजासह देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी रविकिरण पांडे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दिली होती. त्यांनी 8 सप्टेंबर 2019 रोजी विमाननगर येथील मे. स्टार सिटी प्रा. लिं येथून 1 हजार 18 रुपयांची खरेदी केली. यावेळी, स्टार सिटीच्या स्टोअर मॅनेजरने पांडे यांनी कॅरी बॅग देऊन 19 रुपये घेतले. यावेळी, पांडे यांनी चंदिगड ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पुरी दिनेश प्रसाद रातुरी विरुध्द बाटा इंडिया लिमिटेड या प्रकरणातील आदेशाचा संदर्भ देऊन कॅरीबॅग विक्री करून रक्कम स्विकारता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही जाब देणार यांनी पांडे यांच्या विनंतीस कोणतेही प्रतिउत्तर न देता मोफत कॅरीबॅग दिली नाही. याप्रकरणी, पांडे यांनी 11 सप्टेंबर 2019 रोजी ग्राहक आयोगात धाव घेत नोटीसद्वारे मोफत विक्री करायाची वस्तूची रक्कम व नुकसानभरपाईची मागणी केली.
त्यावर जाबदेणार यांना मंचाची नोटीस मिळूनही त्यांकडून कोणीही हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजू ऐकल्यानंतर स्टोअर मॅनेजरने पांडे यांना कराराप्रमाणे सेवासुविधा न देता अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे, जाब देणार यांनी तक्रारदारास कॅरीबॅगची रक्कम 19 रुपये 8 सप्टेंबर 2019 पासून 9 टक्के दसादशे व्याजासह देण्यात यावी. याखेरीज, मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी दहा हजार रुपये आदेश मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.