हैदराबाद – सध्या विविध मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोअर मधून ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर त्या वस्तू घेऊन जाण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या कॅरीबॅगला किंमत आकारली जाते. मात्र यासाठी वेगळी किंमत लावण्याची गरज नाही असा निर्णय हैदराबाद येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
विविध डिपारमेंटल स्टोअरकडून कॅरीबॅगसाठी 3 रुपये ते 15 रुपयांपर्यंतचा दर आकारला जातो असे दिसून येते. आकाश कुमार नावाच्या एका ग्राहकाला हैदराबाद येथील एका मॉलमधून खरेदी केल्यानंतर कॅरीबॅगसाठी 3 रुपये 50 पैसे अतिरिक्त लावण्यात आले. आकाश कुमार यांनी या मॉलमधून 602 रुपयांची खरेदी मे 2019 मध्ये केली होती.
याविरोधात आशिषकमार यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करून ग्राहक तक्रार मंचाने या कॅरीबॅगसाठी दर आकारण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला. याचिकाकर्त्याने ग्राहक तक्रार निवारण मंचाला सांगितले की, मॉलने दिलेल्या कॅरीबॅगवर मॉलचा लोगो होता. मंचाने सांगितले की 2018 मधील नियमानुसार प्लास्टिक कॅरीबॅग दिल्यानंतर तिला वेगळा दर आकारण्याची गरज नसल्याचा नियम तयार करण्यात आला होता.
ग्राहक तक्रार मंचाने संबंधित ग्राहकाला 1 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर कॅरीबॅगसाठी घेतलेले 3 रुपये 50 पैसे परत देण्याची सूचना केली. त्याचबरोबर मॉलला तक्रार निवारण मंच 1 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ती रक्कम 45 दिवसाच्या आत जमा करावी. अन्यथा त्यावर 18 टक्के व्याज लावले जाईल असे ग्राहक तक्रार निवारण मंचाने स्पष्ट केले आहे.