#Lockdown : उद्या रात्री 8 पासून निर्बंध, वीकेंडला लॉकडाऊन – नवाब मलिक

मुंबई – कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध असतील. तसंच राज्यात शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन राहिल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. उद्या रात्री आठ वाजल्यापासून कोरोनाची नवी नियमावली लागू होऊ शकते. सर्व मॉल्स बंद राहणार आहेत, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने देखील बंद राहतील. मात्र इंडस्ट्री सुरू राहील, खासगी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होमला मुभा राहील. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील, असे काही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.

वाहतूक व्यवस्थेवर कोणतेही बंधने नसतील. बस, रेल्वे, रिक्षा-टॅक्सी सुरू राहतील. मात्र आसन क्षमतेवर नियंत्रण असेल. विकेंडला मोठा लॉकडाऊन असेल. शुक्रवारी रात्री आठ वाजता लॉकडाऊन सुरू होईल, तो सोमवारी सकाळी सात वाजता उठेल. या दिवसांत कुठलेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाहीत. सर्व धर्मांची प्राथर्नास्थळे बंद राहतील, मात्र पुजारी पूजाअर्चा करू शकतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत विविध क्षेत्रातल्या लोकांशी संवाद साधला. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही बातचीत केली. याचा हेतू एकच होता की, कोरोनाशी लढत असताना संपूर्ण राज्यात एकजूट दिसली पाहिजे. ज्याप्रकारे आकडेवारी वाढत चालली आहे. याचगतीने रुग्ण वाढत गेले, तर आरोग्य व्यवस्थेत कमतरता भासू शकते. आजच्या बैठकीत कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.  नियमावलीचे पत्रक काढण्यात येईल. वरील सर्व निर्णय महाविकास आघाडीचे तीनही पक्ष, विरोधी पक्ष यांच्या चर्चेनंतर एकमताने घेण्यात आले आहेत. त्यामुळे जनतेला विनंती आहे की, त्यांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी,असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.