पुणे – रेल्वे प्रवासी आणि पुणेकरांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत “रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना 24 तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पुणे विभागात सुरू झालेले हे दुसरे “रेस्टॉरंट ऑन व्हील’ असून, भविष्यात अशा प्रकारचे आणखीन तीन ते चार रेस्टॉरंट सुरू होणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.
पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांचे नेतृत्वात “रेस्टॉरंट ऑन व्हील’चे बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे, हल्दीराम-नागपूरचे संचालक नीरज अग्रवाल, अमोल भगत उपस्थित होते.
पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे कोच रेस्टॉरंट शंभर चौरस मीटर क्षेत्रफळावर रेल्वेच्या कोचमध्ये तयार करण्यात आले आहे. प्रवाशांना या ठिकाणी स्वच्छ आणि सुरक्षित जागेत चोवीस तास खाद्यपदार्थांची मेजवानी घेता येणार आहे. तसेच, प्रवाशांना पार्सल सुविधाही सुरू आहे.
रेल्वेतही मिळणार स्वादिष्ट खाद्यपदार्थ
रेल्वे प्रवासात प्रवाशांना ऑनलाईन पदार्थ बुकिंगमध्ये “रेस्टॉरंट ऑन व्हील’मध्ये जेवणासह अन्य खाद्यपदार्थ बुकींग करण्याची सोय लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी प्रवाशांना एक ते दीड तास अधी ऑनलाईन ऑर्डर करणे आवश्यक आहे. ट्रेन स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांच्या जागेवर तो पदार्थ मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.