अवसरी -अवसरी (वार्ताहर) :अवसरी आणि परिसरात नागरिकांनी जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत यशस्वी बंद पाळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र शासन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवसरी फाटा, अवसरी, तांबडेमळा, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, परिसरात जनता कर्फ्यू मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. दूध डेअरी, दवाखाने, मेडिकल, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार नागरिकांनी बंद ठेवले. सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर जाण्याचे टाळले. गावातील हॉटेल्स, पान टपऱ्या, जनरल स्टोअर्स, किराणा मालाची दुकाने, अशी विविध दुकाने नागरिकांनी बंद ठेवली होती.
कामगार नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही तालुक्यतील जनतेला कर्फ्यूचे पालन करण्याबाबत आवाहन केले आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सर्व सहकारी मंचर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गावागावात आणि वाडीवस्तीवर जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करत होते.