पुणे – कोव्हिड-19 आणि सार्स विषाणूला रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित होणाऱ्या संशोधन आणि विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने इंटरडिसिप्लिनरी आयुष रीसर्च आणि डेव्हलपमेंट टास्क फोर्स स्थापन केला असून, त्याच्या अध्यक्षपदी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, याद्वारे होणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती डॉ. पटवर्धन थेट पंतप्रधान मोदी यांना देणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी दि.28 मार्च रोजी आयुष मंत्रालयाशी निगडित सर्व घटकांशी बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी भारतीय पारंपरिक औषधी आणि वैद्यकीय पद्धतींची माहिती जगाला पटवून देण्यासाठी आयसीएमआर, सीएसआयआर आणि इतर संशोधन संस्थांना एकत्रित येऊन उत्तम संशोधन पुराव्यानिशी जगासमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.
या संशोधनामुळे करोनासारख्या विषाणूजन्य आजारावर उपचार पद्धती मिळाली तर देशासोबतच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आणि समाधानाची बाब असणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाने ही टास्क फोर्स स्थापन केला आहे. या टास्क फोर्समध्ये एकूण 17 विविध संशोधन संस्थांशी निगडित तज्ज्ञ आहेत. डॉ. पटवर्धन हे मूळचे पुण्याचे असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख राहिले आहेत.