“करोना’शी दोन हात करण्यासाठी बॉलीवूड कलाकारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगण याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रिय मुंबई पोलीस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा “सिंघम’ आपली “खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. “जय हिंद, जय महाराष्ट्र!’, असे ट्वीट अजय देवगण याने केले आहे.
करोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणने 25 कोटी 51 लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिले आहे.
गेल्या आठवड्यात अजयने फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजला 51 लाखांची मदत केली होती. बॉलीवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या, म्हणजेच हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याने 51 लाखांची रक्कम दिली होती.